कोरोनाला रोखण्यासाठी आमदारांकडून होमहवन

बेळगाव : कोरोनाविरोधात सुरू असणाऱ्या लढ्यामध्ये भाजप आमदाराने होमहवन केल्याची बातमी समोर येते आहे. बेळगावमधील भाजप आमदाराने होमहवन केल्यानं एकच खळबळ उडालीय. भाजप आमदार अभय पाटील यांनी हे होमहवन केलं आहे.
पर्यावरणाला विषाणूमुक्त करण्यासाठी त्यांनी हा यज्ञ केला. दरम्यान, एवढेच नव्हे तर त्यांनी बेळगाव शहरातील गल्ल्यांमध्ये हा होम पेटलेला गाडादेखील फिरवला. अभय पाटील बेळगाव दक्षिणचे भाजपा आमदार आहेत.
वातावरण शुद्धीकरण करण्यासाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यातर्फे होम हवन करण्यात येत आहे. यासाठी एक गाडी तयार करण्यात आली असून, विशेष कुंड देखील तयार करण्यात आलेत. होम हवन करण्याच्या उपक्रमाला आमदार अभय पाटील यांच्या उपस्थितीत शहापूर भागातील होसुरमध्ये प्रारंभ करण्यात आला. यामुळे वातावरण शुद्धी होणार आहे.
जनतेत या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यकर्ते रिक्षा घेऊन गल्लोगल्ली ध्वनिक्षेपकावरून माहिती देत आहेत. पहिल्याच दिवशी 50 ठिकाणी होम हवन करण्यात आले.
होम करण्यासाठी कडूनिंबाचा पाला, तूप, तांदूळ, कवडी उद, गुगुळ, शेणकुटे, कापूर यांचा वापर करण्यात येत आहे. प्रत्येक भागातील युवक मंडळे आणि महिला मंडळांनी पुढाकार घेऊन होम हवन करून वातावरण शुद्धीकरण करण्याचा उपक्रम यशस्वी करावा.
पूर्वी घरोघरी उद घालण्याची पद्धत होती! पण अलीकडे ती बंद पडली आहे. तरी जनतेने पूर्वीप्रमाणे आपल्या घरात उद घालण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी. यामुळे प्रदूषित वातावरणाचे शुद्धीकरण होण्यास मदत होईल.
15 जूनपर्यंत हा उपक्रम संपूर्ण बेळगाव दक्षिण मतदारसंघात गल्लोगल्ली राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली. शहापूर, वडगाव, खासबाग आणि अन्य भागात पुढील दिवसात हा वातावरण शुद्धीकरण करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.





