‘आंबेडकरांनी देखील संविधानात…’, मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर RSS ने दिली प्रतिक्रिया

RSS on Religion-based reservation | गेल्याकाही दिवसांपासून मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून कर्नाटकमधील राजकीय वातावरण तापले आहे. कर्नाटक सरकारकडून सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावरून भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. आता यावर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून देखील भूमिका मांडण्यात आली आहे.
आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी याबाबत मत व्यक्त केले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय संविधानात देखील धर्मावर आधारित आरक्षण स्वीकारलेले नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
बंगळुरू येथे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची तीन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीच्या शेवटच्या दिवशी बोलताना होसबळे यांनी आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, “बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात धर्मावर आधारित आरक्षण स्वीकारलेले नाही. कोणीही असे करत असेल तर ते आपल्या संविधानाच्या शिल्पकारांच्या विरोधात जात आहे.
यापूर्वी संयुक्त आंध्र प्रदेश महाराष्ट्राने मुस्लिमांसाठी आरक्षण देण्याचा केलेला प्रयत्न उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता, हे देखील त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना त्यांनी औरंगजेबाच्या मुद्यावर देखील भाष्य केले. औरंगजेब भारतातील लोकांसाठी एक आदर्श असू शकतो का? देशाचा आयकॉन बाहेरचा किंवा दुसरा कोणी असेल. यावर विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. दिल्लीत एक ‘औरंगजेब रोड’ होता, ज्याचे नाव अब्दुल कलाम रोड असे ठेवण्यात आले. यामागे काही कारणे होती. औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोह याला नायक बनवण्यात आले नाही. गंगा-जमुना संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी दारा शिकोह यांना पुढे आणण्याचा विचार कधीच केला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केला.





