दररोज 10 लाख लिटरची भुकटी करणार
पुणे – करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीतही राज्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अतिरिक्त ठरणाऱ्या दुधापैकी प्रतिदिन 10 लक्ष लिटर दुधाचे रुपांतरण दूध भुकटीत करण्यास व त्यासाठी येणाऱ्या 187 कोटी इतक्या खर्चास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे दूध डेअऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम दिसून आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 24 मार्च पासून लॉकडाऊन घोषित केला आहे. यामुळे बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट झाली असून हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्ठान्न निर्मिती केंद्र मोठ्या प्रमाणात बंद झाली आहेत. परिणामी, राज्यातील दुधाच्या मागणीत घट झाल्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झालेला होता.
अतिरिक्त दुधाच्या नियोजनावर उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती.राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) व्यवस्थापकीय संचालकांनी राज्यातील प्रतिदिन 10 लक्ष लिटर अतिरिक्त होणाऱ्या दुधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन प्रतिदिन 10 लक्ष लिटर दुधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्यास व त्यासाठी 187 कोटींचा निधीची मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.