प्रभात वृत्तसेवा पुणे – गेल्या २४ तासांत किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील कडाक्याचा थंडीचा जोर कमी झाला आहे. ७ अंशांवरील थंडीचा पारा आज ९ अंशांपर्यंत आला. हवेली आणि माळीण परिसरात पारा ९, तर अन्य परिसरातील किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात हळूहळू घट होऊ लागली आणि बोचऱ्या थंडीला सुरवात झाली. मागील आठ दिवसांत तर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून, पुणे, जळगाव, अहिल्यानगरसह अन्य जिल्ह्यांत थंडीची लाट आली. थंडीचा कडाका एवढा वाढला, की यंदाच्या हंगामातील पुणे शहरातील हवेली परिसरात नीच्चांकी ६ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला आणि पुणेकर गारठले. मात्र, गेल्या ४८ तासांत थंडीचा पारा हळूहळू वाढू लागला आहे. बुधवारी (दि. १९) शहरात ७ ते ९ अंशांच्या आसपास असलेले किमान तापमान आज (दि. २०) ९ ते १२ अंशापर्यंत पोहोचले. गेल्या २४ तासांत दोन ते तीन अंशांनी किमान तापमानात वाढ झाल्यामुळे काडाक्याच्या थंडीचा जोर काहीसा कमी झाला, तसेच दिवसभर उन्हाचा हलकाचा चटकाही जाणवत होता. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. आकाश निरभ्र आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहरासह जिल्ह्यातील आजचे किमान तापमान हवेली ९, माळीण ९.७, पाषाण १०.५, तळेगाव दाभाडे १०.८, शिवाजीनगर ११, बारामती आणि आंबेगाव ११.१, निमगिरी ११.२, दौंड ११.५, गिरीवन १३.९, कोरेगाव पार्क १४.८, चिंचवड १५.३, वडगावशेरी १६.५ अंश सेल्सिअस.