Raj Thackeray : राज ठाकरेंना दिलासा ! कोर्टाने ‘त्या’ प्रकरणी केली निर्दोष मुक्तता

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 च्या हिंसाचाराप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी त्यांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली आहे. कोणताही पुरावा नसताना राज ठाकरे यांच्याविरोधात फौजदारी खटला चालविणे म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने या प्रकरणी नोंदवले आहे.
2008 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती. याचदरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी परळी-गंगाखेड मार्गावर एसटी बस थांबवून दगडफेक केली होती. या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांविरोधात सार्वजनिक मालमत्तेस नुकसान पोहचवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू होती. या सुनावणीअंती राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
घटनेवेळी राज तिथे उपस्थित नव्हते
घटना घडतेवेळी राज ठाकरे हे तिथे उपस्थित नव्हते. तसेच त्यांनी आंदोलनकर्त्यांना आदेश दिल्याचा कोणताही पुरावा दोषारोपपत्रात नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत दाखल गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करुन त्यांची निर्दोष सुटका केली.





