पुणेकरांना दिलासा! सलग सातव्या दिवशी कमाल तापमानात घसरण, पुढच्या तीन दिवसात…

The temperature in Pune is low : मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते एप्रिलच्या पूर्ण महिन्याभर पुण्यातील तापमान वाढले होते. वाढलेल्या तापमानामुळे पुणेकरांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत होत्या. आता गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कमाल तापमानात मोठी घसरण झाली असल्याचे चित्र आहे.
तब्बल सात अंशांनी कमाल तापमानात घट झाली आहे. यामुळे चाळीशीला टेकलेला तापमानाचा पार आता थेट ३३ अंश सेल्सिएस तापमानावर येऊन ठेपला आहे. परिमाणी पुणेकरांना वाढत्या आणि रखरखीत उन्हापासून दिलासा मिळाला आहे. असे असले तरी दि. ९ मेपासून पुढचे तीन दिवस महत्वाचे असणार आहेत.
या दिवसांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला पुढील तीन दिवस ‘यलो अर्लट’ जारी करण्यात आला आहे. तसेच कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे परिसरातील दिनांक ९ मे शुक्रवार कमाल तापमान स्थिर राहणार असून किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.





