पूरग्रस्तांना दिलासा: शिक्षकांनी दिला एक दिवसाचा पगार

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटात मदतीचा हात पुढे करत स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
शिक्षकांचा पुढाकार –
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव आणि सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले आहे. शिक्षकांनी दाखवलेल्या या सामाजिक जबाबदारीचे कौतुक करताना मंत्री भुसे म्हणाले, “शिक्षकांचा हा पुढाकार प्रेरणादायी आहे. यामुळे समाजातील इतरांनाही प्रोत्साहन मिळेल आणि पूरग्रस्तांना मोठा आधार मिळेल.”
पूरग्रस्त भागांची पाहणी –
राज्यातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळातील सदस्य थेट गावांमध्ये भेटी देत आहेत. याच अनुषंगाने दादा भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यातील कन्हेरगाव नाका, आंबाळा, माळहिवरा, भिरडा, कळमनुरी आणि डोंगरगाव पूल या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. पुरामुळे शेतजमिनी, सोलर पंप, रस्ते, विद्युत खांब आणि घरांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले.
नुकसानग्रस्तांना तातडीने मदत –
पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन भुसे यांनी दिले. “शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली, जनावरे मृत्युमुखी पडली आणि घरे पाण्याखाली गेली. या सगळ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असे ते म्हणाले.
शिक्षकांच्या या संवेदनशील निर्णयामुळे आणि शासनाच्या तातडीच्या उपाययोजनांमुळे पूरग्रस्तांना आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.





