जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यानंतर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. केळीचे भाव 400 ते 600 रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता अवकाळीचे वातावरण निवळल्यानंतर केळीच्या भावात सुधारणा होत असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीचे भाव कमाल 1800 आणि सरासरी 1451 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत, जे 10-12 दिवसांपूर्वी अनुक्रमे 1300 आणि 1100 रुपये होते. यामुळे भावात सुमारे 500 रुपयांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअसवर असल्याने नवती केळी बागांची होरपळ वाढली होती. अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी घाईने काढणी केल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडले. परंतु, आता मागणीच्या तुलनेत बाजारात आवक कमी असल्याने भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे. बऱ्हाणपूर बाजारात दररोज 125 ते 140 गाड्यांची आवक होत आहे. जाणकार शेतकऱ्यांनी भावातील ही सुधारणा पुढील काळात कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.