मुंबई : तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रखडली होती. ही प्रक्रिया आता मार्गी लागली आहे. या निर्णयामुळे 12 हजार शिक्षकांना मूळ गावात किंवा जिल्ह्यात परत येता येणार आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा सुरु होत आहे. त्यासाठी 31 मे 2026 पर्यंतची रिक्त पदे विचारात घेतली जातील. शिक्षक भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याची सुरुवात ग्रामविकास विभागात करण्यात आली आहे. त्यामुळे 31 मे 2026 पर्यंतची रिक्त पदे उपलब्ध होतील. शिक्षकभरती प्रक्रियेपूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी वेगळे वेळापत्रक केले जावे, शिक्षकभरती करण्याआधी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया प्रत्यक्षात यावी, काही जिल्ह्यांमध्ये विशिष्ट प्रवर्गाच्या जागा उपलब्ध नसल्यास तेथे शून्य बिंदू नामावली गृहीत धरून अशा शिक्षकांच्या स्वगृही बदल्या कराव्यात, अशा शिक्षकांच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी प्रहार शिक्षक संघटनेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिवांकडे पाठपुरावा केला होता. यासंदर्भात प्रधान सचिवांनी 6 जानेवारी रोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेत सूचना केल्या. तसेच आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा सुरू करण्यापूर्वी जिल्हा परिषदांना शिक्षक संवर्गाचे रोस्टर ठराविक कालावधीत अद्ययावत करण्याच्या सूचना द्याव्यात. जिल्ह्यात पेसा क्षेत्रात 20 आणि बिगर पेसा क्षेत्रात 80 टक्के रिक्त पदे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेकरिता उपलब्ध करून द्यावीत, आंतरजिल्हा बदली करताना उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना आरक्षित पदांवर उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती पदे शिक्षक भरतीप्रमाणे खुल्या प्रवर्गाकरिता परावर्तित करावीत, 31 मे 2026 अखेरपर्यंतची रिक्त पदे गृहीत धरावीत, याकडे शिक्षक संघटनांनी लक्ष वेधले होते. यामुळे 12 हजार शिक्षक त्यांच्या जिल्ह्यात परतणार आहेत. तीन वर्षांपासून जिल्हांतर्गत बदल्या होत नव्हत्या.