Musk Vs Ambani : ‘स्पर्धेची भीती नाही’; मस्क यांच्या आरोपांवर रिलायन्सचा थेट पलटवार
Musk Vs Ambani : स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशावरून एलॉन मस्क यांच्या आरोपांना रिलायन्सने उत्तर दिले. स्पर्धेचे स्वागत असून सर्व कंपन्यांना भारतीय कायदे व नियमांचे पालन करावे लागेल, असे कंपनीने स्पष्ट केले.

Musk Vs Ambani : भारतात स्टारलिंकच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजने एलॉन मस्क यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्रातील स्पर्धेचे आपण स्वागत करतो; मात्र भारतात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक कंपनीला देशातील कायदे आणि नियमांचे पालन करावे लागेल, असे रिलायन्सने स्पष्ट केले आहे.
स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी भारतात स्टारलिंकच्या सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक मंजुरी मिळण्यास होत असलेल्या विलंबावर प्रश्न उपस्थित केले होते. काही व्यावसायिक हितसंबंध स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाला अडथळा आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. थेट मुकेश अंबानी यांना लक्ष केले होते. या पार्श्वभूमीवर रिलायन्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपली भूमिका मांडली.
रिलायन्सने म्हटले की, कंपनीला स्पर्धेची कधीही भीती वाटलेली नाही. ग्राहकांना चांगली सेवा कोण देते, हे ठरवण्यासाठी स्पर्धा महत्त्वाची आहे. कंपनीने आपल्या जिओ व्यवसायाचे उदाहरण देताना सांगितले की, २०१६ मध्ये जिओने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा कंपनीकडे एकही ग्राहक नव्हता. आज जिओचे ५३ कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत. स्वस्त मोबाइल डेटा आणि डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात जिओने योगदान दिल्याचा दावा रिलायन्सने केला.
जिओलाही मंजुरीची प्रतीक्षा
रिलायन्सने स्टारलिंकसह सॅटेलाइट कम्युनिकेशन क्षेत्रात येणाऱ्या सर्व कंपन्यांचे स्वागत केले आहे. मात्र, जिओसह प्रत्येक कंपनीला देशातील कायदे, नियम आणि धोरणांचे पालन करावे लागेल, असे कंपनीने स्पष्ट केले.
भारत सरकारकडून सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व कंपन्यांना समान प्रक्रिया लागू असल्याचे सांगण्यात आले आहे. रिलायन्सच्या जिओला देखील सॅटेलाइट सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे स्टारलिंकला विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप रिलायन्सने थेट केला नाही; मात्र सर्व कंपन्यांसाठी नियम समान असावेत, अशी भूमिका मांडली आहे.
स्टारलिंक भारतात व्यावसायिक सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. तिच्या प्रवेशामुळे सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्रातील स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. सरकारनेही या क्षेत्रात कोणत्याही एका कंपनीची मक्तेदारी राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मस्क यांनी अंबानींवरही सवाल उपस्थित केले
एलॉन मस्क यांनी भारतातील दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. स्टारलिंकला आवश्यक मंजुरी मिळण्यास होत असलेल्या विलंबावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. एका ‘एक्स’ पोस्टमध्ये त्यांनी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना उद्देशून स्टारलिंकला भारतात स्पर्धा करण्याची परवानगी देण्याबाबत विचार करावा, असा टोला लगावला होता.
मस्क यांनी आणखी एका पोस्टमध्ये अंबानी हेच भारताचे खरे बॉस आहेत का, असा सवाल केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मस्क यांच्या भूमिकेला समर्थन दिले होते.
‘सॅटेलाइट क्षेत्रात मक्तेदारी नाही’
मस्क यांच्या आरोपांनंतर केंद्र सरकारने त्यांचे आरोप फेटाळले. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सॅटेलाइट कम्युनिकेशन क्षेत्रात कोणत्याही एका कंपनीची मक्तेदारी होऊ दिली जाणार नसल्याचे सांगितले.
सिंधिया यांच्या मते, तीन कंपन्या व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवांच्या दरांबाबतचे नियमही लवकरच निश्चित होण्याची शक्यता आहे. स्टारलिंकसह सर्व कंपन्यांना सेवा सुरू करण्यापूर्वी सुरक्षा संबंधी आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागतील.
दरम्यान, भारती एअरटेलचे संस्थापक सुनील भारती मित्तल यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या कंपनीची यूटेलसॅट वनवेबने भारतात सॅटेलाइट इंटरनेट आणि कम्युनिकेशन सेवा सुरू करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी अर्ज केला होता. कंपनीचे ग्राउंड नेटवर्क तीन वर्षांपासून तयार असल्याचे सांगत, आपण मंजुरीच्या रांगेत मस्क यांच्यापेक्षा पुढे असल्याचे मित्तल यांनी म्हटले होते.





