जोसेफ जागतिक पातळीवर “चिमण्यांचा दिवस’ साजरे होत असलेल्या एक तप लोटले. इवलीशा चिमण्यांची आठवण झाली की शंकर रमणी यांच्या खालील गीताची हमखास धून कानात गुंजते- माझिया दारात चिमण्या आल्या अबोल काहीसे बोलून गेल्या… कळले सारे नि कळले नाही अबोल मनाची हासली जुई… दाटून दिशांत उठला गंध झडली जाणीव गळले बंध… प्राणांस फुटले अद्भुत पंख तंद्रीत भिनला आकाश डंख… माझिया दारात चिमण्या आल्या आगळे वेगळे सांगून गेल्या. इवलीशी चिऊताई, पण आपल्या प्रचंड परिसंस्थेत तिचं किती महत्त्वाचे स्थान आहे! “एक घास काऊचा, एक घास चिऊचा’ म्हणत जेऊ घालणारी आई व मोठे होत जाणारे आपण त्या स्मृतीलुब्ध आठवणी सोबत घेऊन जगत असतो. जुन्या घरात माळ्यावर, ओटीवर टांगविलेल्या फ्रेमच्या मागे, लाकडी खांबाच्या आडोशाला चिमणी खोपा बांधायची. त्यात तंतू, पिसे गोळा करून मऊमऊ बिछाना तयार करायची. आपण ते सारे कुतुहलाने न्याहाळायचो. अंड्यापासून पिल्ले तयार होईपर्यंत चिमणा-चिमणीची काय ती लगबग चालायची! पण गावातील जुनी घरे नामशेष झाली. नागरी वस्ती वाढल्या. चिमण्या भुर्र उडून गेल्या. त्यातच सणासुदीला फुटणारे कर्कश आवाजाचे फटाके यामुळे उरल्यासुरल्या चिमण्या सैरभैर झाल्या. दाण्यापाण्याला मोताद झाल्या. गेल्या होलीकोत्सवात कवी अरुण म्हात्रे म्हणाले होते- आज जरा कन्फुज आहे हो, रंग कसा उधळू मी? आज दिवस चिमण्यांचा आहे, रंग कुठे उडवू मी? मान्य मला ही होली आहे, मनात ह्या पिचकाऱ्या… चिमण्यांच्या चोचीतले पाणी असे कसे संपवू मी?