गोदावरी कालव्यांना ओव्हर-फ्लोचे पाणी सोडा

कोपरगाव – कोपरगाव मतदारसंघात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, या पावसावर मतदारसंघातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे खरिपाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे ओव्हर-फ्लोचे जायकवाडीला वाहून जाणारे पाणी गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना सोडा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाअभावी खरीप हंगामाचे भवितव्य टांगणीला लागले आहे. पावसाचा मागमूस दिसत नसल्यामुळे पिकांना वेळेत पाणी मिळाले नाही, तर खरीप हंगाम धोक्यात येन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत असून, पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पेरणीचा हंगाम हातातून सुटू नये यासाठी झालेल्या अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, बाजरी, कापूस, मका, चारा पिके आदी पिकांच्या पेरण्या केल्या. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे आता खरिपाची पिके जळून चालली असून, ऊस पिकाला देखील फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
दुसरीकडे मतदारसंघातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून जवळपास 12 हजार क्युसेकने ओव्हर-फ्लोचे पाणी जायकवाडी धरणाकडे वाहून जात आहे. धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून, गोदावरी कालव्याचे लाभक्षेत्र अवलंबून असलेले दारणा धरण 78 टक्के व गंगापूर धरण 68 टक्के भरले आहे. दारणा धरणातून 11 हजार 552 क्यूसेक व गंगापूर धरणातून 539 क्यूसेक असा ओव्हर-फ्लोच्या पाण्याचा जवळपास 12 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू असून, यामध्ये वाढदेखील होण्याची शक्यता आहे. मात्र, मतदारसंघातील खरीप हंगाम मात्र पावसाभावी धोक्यात आला आहे.
त्यामुळे वेळेत जर खरीप पिकांना पाणी मिळाले नाही, तर खरीप पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी तातडीने गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना ओव्हर-फ्लोचे पाणी सोडण्याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणी आ. काळे यांनी निवेदनात केली आहे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, याबाबत तातडीने निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिल्याचे आ. काळे यांनी सांगितले आहे.





