पुणे : करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अटी व शर्तींमध्ये शिथिलता आणावी, प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे सादर करण्यासाठी विशेष मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या आदेशानुसार, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सुनील जगताप यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांसह अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांना निवेदन दिले आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, डोमिसाइल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट आदी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. स्टॅंप पेपरही लागतात. करोनामुळे शासकीय कार्यालयांचे कामकाज पूर्णपणे सुरू झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ विविध दाखले काढणे सहजासहजी शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांकडे दाखले नसल्याने निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना त्याच्या मूळ आरक्षणातुन बाद होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देणे गरजेचे आहे.
“इन हाऊस क्षेत्र’ रद्द करून “इन हाऊस कॅम्पस’ असे परिपत्रक काढून त्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवावी. नियमित प्रवेश प्रकिया राबविण्याच्या पूर्वीच्या शासन निर्णयानुसार व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक कोटा तसेच इन हाऊस कोटा, विशेष कोटा या सर्व जागा वेळापत्रक राबवून नियोजित वेळेत भरावेत. रिक्त राहणाऱ्या जागा नियमित प्रवेशासाठी प्रत्यार्पित कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. जगताप यांनी अनुराधा ओक यांच्याशीही चर्चा केली आहे. या मागण्यांबाबत प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे पाठणार असल्याचे आश्वासन ओक यांनी दिले आहे.