“संदीप क्षीरसागर आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेचे संबंध”; धनंजय मुंडेंचा पलटवार

Sandip Kshirsagar And Krushna Aandhale | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. याशिवाय यातील खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावण्यात आला आहे. परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. कृष्णा आंधळे याचे काही बरं वाईट झाल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला होता.
संदीप क्षीरसागर यांनी ‘कृष्णा आंधळे सापडेल असं वाटत नाही. कारण परळीचा इतिहास बघता त्याची सापडण्याची शक्यता कमी आहे. पोलिसांना कृष्णा आंधळे सापडायचा असता तर तो मागेच सापडला असता. त्याच्या जीवाशी घातपात झाला असावा,” असे म्हंटले. त्यावर धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांना एवढं सगळं माहिती आहे. त्याअर्थी त्यांचे आणि आरोपींचे संबंध असले पाहिजेत. त्याशिवाय त्यांना एवढी माहिती मिळणार नाही, असा पलटवार केला. आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांना धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे दिले. त्यानंतर आज मुंडे यांच्या राजीनाम्याचा फैसला होणार अशी चर्चा होती. त्याविषयी धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचा निर्णय हा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे सांगितले. Sandip Kshirsagar And Krushna Aandhale |
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतिक घुले, केदार हे अटकेत आहेत. कृष्णा आंधळे मात्र अद्यापही फरार आहे. विशेष म्हणजे वाल्मिक कराड हा स्वतःहून सरेंडर झाला होता. यानंतर आता त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याचा देखील आरोप केला जात आहे. त्याबाबत सातत्याने नवनवे खुलासे होत आहेत.
हेही वाचा:
शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटातील दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री, सिनेमात केले ‘हे’ मोठे बदल





