नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर उद्या सोमवारी (दि.18) सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती मंगेश कुलकर्णी यांच्यासमोर ही सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात रेखा जरे यांची हत्या झाली. त्या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपी अटक केलेले आहेत. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाला आहे. दीड महिन्यापासून पोलीस त्याचा शोध घेत आहे. परंतु, तो मिळून आलेला नाही.
त्याच्या शोधासाठी पोलिसांनी नगर जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यांत छापे घातले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी बोठे विरोधात पारनेर न्यायालयाकडून स्टॅंडिंग वॉरंट मंजूर करून घेतले असून, हे वॉरंट राज्यातील पोलीस ठाण्यात पाठविले आहे.
बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्वसाठी अर्ज दाखल केला आहे. यावर आता सोमवार (दि.18) रोजी सुनावणी होणार आहे.
वकिलाने केली पोलीस संरक्षणाची मागणी
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा पसार आहे. बोठे व त्याच्या हितचिंतकांकडून जीवाला धोका असून, बोठेला अटक होईपर्यंत पोलीस संरक्षण देण्याची मागणी मूळ फिर्यादींचे वकील सचिन पटेकर यांनी केली आहे. ऍड. पटेकर यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पत्र दिले आहे.