CM Rekha Gupta : रेखा गुप्ता यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित पार पडला दिमाखदार शपथविधी सोहळा

नवी दिल्लीः दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. नवी दिल्लीचे राजपाल यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थित लाभली होती. शपथ ग्रहण सोहळ्याला मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि दिल्लीकर उपस्थित होते. मुख्यमंत्री गुप्ता यांच्यासोबत इतर मंत्र्यांनी देखील पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
यावेळी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता भगव्या साडीत दिसल्या. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. त्यांच्या आधी आतिशी, शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत. रेखा गुप्ता शालिमार बागच्या आमदार आहेत. तीन वेळा आम आदमी पक्षाच्या आमदार बंदना कुमारी यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्य, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, खासदार आणि NDA घटक पक्षांचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचवेळी कार्यक्रमाला अन्य मान्यवरांसह 50 हजार नेते, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.





