नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हल्ला झाल्याची घटना घडली. यानंतर दिल्ली पोलिसांनी राजेश खिमजी साक्रिया याला ताब्यात घेतले आहे. या आरोपीबद्दल आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. साक्रिया हा गुजरातच्या राजकोट येथील रहिवासी असून त्याच्या विरोधात एकाच पोलीस ठाण्यात तब्बल ९ गुन्हे दाखल आहेत. यापैकी बहुतेक हे दारूच्या नशेत गैरवर्तन केल्याचे, तर काही गुन्हेगारी धमकी आणि हल्ला केल्याचे असे आहेत. साक्रिया याची आई भानू साक्रिया ही देखील राजकोट येथील अजी दाम पोलीस ठाण्याच्याच्या जवळ राहते. तिने सांगितले की, तिचा मुलगा हा श्वान प्रेमी आहे आणि नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील प्रशासनाला सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टरमध्ये ठेवण्याचे निर्देश दिल्यामुळे तो नाराज होता. तो रविवारी दिल्लीला गेला होता. ३६ वर्षीय राजेशचे वडील एक रिक्षाचालक आहेत. राजेशने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना मारण्याचे कारण विचारले असता, आई भानू साक्रिया म्हणाल्या की, त्याचा स्वभावच तापट आहे. तो कुठल्याही कारणावरुन कुणालाही मारतो. त्याने मला, त्याच्या पत्नीला असे सगळ्यांना मारले आहे. त्याला मानसिक आजार असून कुत्र्यांविषयी तो भावूक झाल्याने बहुधा त्याने थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला असावा.