पुनर्वसन जमीन वाटप घोटाळ्याची व्याप्ती वाढली

चौकशी समितीच्या मदतीला आणखी आठ अधिकाऱ्यांची कुमक

पुणे – जिल्ह्यातील पुनर्वसन जमीन वाटप घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या मदतीला आठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी विभागीय आयुक्तांकडे दाखल झाल्या होत्या. तसेच विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले आहे. या सर्वांची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन जणांची चौकशी समिती स्थापन करून काम सुरू करण्यात आले होते. परंतु अद्याप चौकशीचे काम पूर्ण झालेले नाही.

या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांनी शिरूर तालुक्‍यातील पुनर्वसन जमिनी वाटपात झालेल्या गैरप्रकाराबाबत चर्चा झाली. या बैठकीत कोल्हे, पवार यांच्यासह उपस्थितांनी या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केली. त्यावर “संबंधित अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरू आहे,’ असे जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले. तक्रारींचे स्वरूप आणि संख्या पाहता विभागीय आयुक्तांनी चौकशीचे काम गतीने व्हावे, यासाठी दोन उपजिल्हाधिकारी, तीन तहसीलदार यांच्यासह आठ जणांची मदतनीस म्हणून नेमणूक करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.