अहिल्यानगर जिल्ह्यात अॅग्रीस्टॅक योजनेत सात लाख शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण

नेवासा : शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देऊन सरकारी योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देणाऱ्या ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेला अहिल्यानगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण १३ लाख ३५ हजार १२ शेतकऱ्यांपैकी ७ लाख २० हजार १७१ शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी पूर्ण केली असून, ५२.४५ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे.
शेवगाव तालुक्याने ४९,८५७ शेतकऱ्यांची नोंदणी (७५.८८ टक्के) करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. ही योजना शेतकऱ्यांना डिजिटल युगाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोपरगाव येथे ३९,१९१ (६५.४६ टक्के), श्रीरामपूर २९,३८० (६३.६० टक्के), नेवासा ७२,६४८ (५९.६९ टक्के), राहुरी ४९,३३३ (५६.८० टक्के), कर्जत ५०,७३० (५५.६६ टक्के), राहाता ३६,२६२ (५४.६६ टक्के), जामखेड ४१,५४८ (५०.४९ टक्के), अकोले ४३,१३९ (४९.१७ टक्के), संगमनेर ७५,१६५ (४९.२९ टक्के), पाथर्डी ५५,०४७ (४८.७० टक्के), पारनेर ६७,४५१ (५३.१९ टक्के), अहिल्यानगर ४६,४३५ (३९.०७ टक्के) आणि श्रीगोंदा ६३,९८५ (५५.१५ टक्के) शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. ही आकडेवारी शेतकऱ्यांचा या योजनेवरील विश्वास दर्शवते.
केंद्र शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ पासून महाराष्ट्रासह २४ राज्यांमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांची आधार संलग्न माहिती एकत्रित करून त्यांना विशिष्ट ओळख क्रमांक देणे आणि सरकारी योजनांचा त्वरित लाभ मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. यामुळे प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, कर्ज प्रक्रिया, शेतीविकासासाठी सहाय्य, बाजारपेठ प्रवेश, डिजिटल सेवांचा लाभ, नव्या योजनांची माहिती, पीक विमा आणि आपत्ती व्यवस्थापनातील नुकसान भरपाई प्रक्रिया सुलभ होणार आहे.
शेतकऱ्यांना सीएससी केंद्र, तलाठी, कृषी सहाय्यक किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत https://mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर मोफत नोंदणी करता येते. ऑनलाईन प्रक्रिया अवघड वाटणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गावपातळीवर महसूल विभागातर्फे विशेष मोहीम राबवली जात आहे. यामध्ये आधार क्रमांक सातबारा उताऱ्याशी जोडून नोंदणी केली जाते. ही मोहीम शेतकऱ्यांना डिजिटल युगाशी जोडण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.





