पुणे | एक लाख २२ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. केवळ १४ दिवसांत १ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे.
राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता यावा,
यासाठी महावितरणने संकेतस्थळ तयार केले असून, त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. १३ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. त्यानंतर केवळ १४ दिवसांत म्हणजेच दि. २७ सप्टेंबरपर्यंत राज्यातील १,२२,४२१ शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर अर्ज दाखल केले होते
या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात. शेतकऱ्यांना सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा सर्व संच केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळतो.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे. शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरूपात मिळते.
सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसविला, की शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते.
शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहात नाही, तसेच त्याला बिलही येत नाही.
सिंचनासाठी केवळ दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोयीचे होते. राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांकडून तिला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या वेबसाइटवर नोंदणी करा
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करावा. संकेतस्थळावर योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे, तसेच शेतकरी वीज ग्राहकांचे शंका समाधान करण्यासाठी सविस्तर प्रश्नोत्तरेही आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर पुढील प्रगतीची माहितीही संकेतस्थळावर तपासता येते.

