लॉकडाऊनमुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय पुणे – मृत्युपत्र, वाटणीपत्र, हक्कसोडपत्र, बक्षीसपत्र, चूकदुरूस्तीपत्र अशा प्रकाराच्या नवीन दस्तांची नोंदणी दि. 20 जूनपर्यंत थांबविण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. मात्र, ज्यांची मुदत संपणार आहे, अशांची नोंदणी सुरू ठेवण्यात येणार आहे. तर भाडेकाराराची नोंदणी जुलैपर्यंत थांबविण्यात येणार असून त्यांना ई- रजिस्ट्रेशनचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याने शहरासह जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. करोना विषाणूचा संसर्ग ज्या भागात नियंत्रित आहे, असा भाग राज्य सरकारकडून निश्चित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्या भागात दस्तनोंदणी कार्यालय सुरू करण्यात येणार आहेत. कार्यालय सुरू करतानाही त्या ठिकाणी काय काळजी घ्यावी, कोणत्या प्रकाराच्या दस्त नोंदणी सुरू ठेवावी, याबाबतच्या उपयोजना व सूचना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई वगळता राज्यातील अन्य भागात दस्त नोंदणी कार्यालय सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 3 मेपर्यंत लागू राहणार आहे. परंतु दि. 20 एप्रिलनंतर पुरेशी काळजी घेऊन काही सुविधा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा देखील समावेश आहे. त्यापार्श्वभूमीवर नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी या संदर्भातील एक परिपत्रक जारी केले आहे. दस्त नोंदणीसाठी महत्त्वाच्या सूचना ज्या भागात दस्त नोंदणी कार्यालय सुरू करण्यात येतील, त्या कार्यालयांच्या वेळा या सकाळी 9 ते सायंकाळी 7 असाव्यात. दस्त नोंदणी करताना कार्यालयात गर्दी होणार नाही, यांची काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसास होमगार्ड अथवा पोलिसांची मदत घ्यावी. दस्तनोंदणीसाठी नागरिकांना आरक्षित वेळ देऊनच नोंदणी करावी. नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये सामासिक अंतर ठेवणे बंधनकारक करावे. जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन होणार नाही, यांची काळजी घ्यावी. कार्यालय सुरू करण्यापूर्वी ते संपूर्ण निर्जंतुकीकरण करून घ्यावे. दर पंधरा दिवसांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे स्क्रिनिंग करावे. आदी सूचना करण्यात आल्या आहेत.