प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर), इयत्ता आठवीच्या (उच्च प्राथमिक स्तर) परीक्षेसाठी नव्याने नोंदणी करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता इच्छुकांना १४ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव प्रमोद गोफणे यांनी दिली आहे.विविध कारणांमुळे औपचारिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी संधी मुक्त विद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होते. पाचवी, आठवीसाठीची नोंदणी प्रक्रिया मुक्त विद्यालयामार्फत करण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर १९ ते २९ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करता येणार आहेत. ४ सप्टेंबरपर्यंत संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्काची रक्कम, कागदपत्रे, विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे जमा करायची आहे.