Javed Akhtar : ‘धर्म कोणताही असो, प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम आहे’; जावेद अख्तर यांचं वक्तव्य
Javed Akhtar : जावेद अख्तर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Javed Akhtar : प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. सामाजिक, राजकीय तसेच विविध विषयांवर ते अनेकदा परखडपणे आपली मते मांडताना दिसतात. त्यांच्या विधानांमुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चा रंगते, तर काही वेळा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता पुन्हा एकदा त्यांच्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
जावेद अख्तर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी ‘राम प्रत्येक भारतीयाच्या रक्तात आहे’, असे विधान केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ शेअर केला असून, तो मुंबईतील एका कार्यक्रमातील असल्याचे समोर आले आहे.
‘मन से रावण जो निकले, राम उसके मन में हैं’ या ओळीचा अर्थ सांगितला
या कार्यक्रमात जावेद अख्तर यांना ‘स्वदेस’ चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेल्या ‘पल पल है भारी, वो विपदा है आयी’ या गीतातील ‘मन से रावण जो निकले, राम उसके मन में हैं’ या ओळीबाबत प्रश्न विचारण्यात आला. या ओळींचा लोकांच्या मनावर मोठा प्रभाव पडला. मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ चित्रपटातील गाण्यांना तसा प्रभाव का पाडता आला नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
#WATCH | Mumbai, Maharashtra: “…Ram is not just about a person; Ram is a morality. Ram is a way of living. Ram is certain aesthetics, certain morality…Ram is in the blood of every Indian, whatever religion they follow. He is a way of life…,” says lyricist Javed Akhtar while speaking on the lines ‘Mann se Ravan jo nikale, Ram uske Mann main hai’ from ‘Pal Pal Hai Bhaari’ from Swades, a song penned by him.
— ANI (@ANI) November 17, 2026
यावर उत्तर देताना जावेद अख्तर यांनी मिश्किल अंदाजात म्हटले, “याचं साधं उत्तर असं आहे की मी एक चांगला लेखक आहे. त्यामुळे माझ्या ओळी लोकांच्या मनाला भिडतात. मग अडचण काय आहे?” त्यांचे हे उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. जावेद अख्तरही यावेळी हसू लागले.
‘राम ही एक कल्पना, नैतिकता आणि जीवनशैली आहे’
यानंतर त्यांनी या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले. जावेद अख्तर म्हणाले की, “राम म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक कल्पना आहे. राम म्हणजे नैतिकता आणि जीवनशैली आहे. राम विशिष्ट नैतिक मूल्यांचे प्रतीक आहेत. त्यामुळे रामाकडे या दृष्टिकोनातून पाहिले, त्यांना समजून घेतले आणि त्यांच्या विचारांचे कौतुक केले, तर ते नक्कीच मनाला स्पर्श करतात.”
‘भारताच्या प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात राम आहे’
आपल्या वक्तव्यामुळे काही लोक नाराज होऊ शकतात, याची जाणीव असल्याचेही जावेद अख्तर यांनी सांगितले. मात्र, त्यांनी आपले मत ठामपणे मांडले. ते म्हणाले “मी जे बोलतोय ते ऐकून अनेक लोक नाराज होऊ शकतात. भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात राम आहे. त्यांचा धर्म कोणताही असो, राम त्यांच्या रक्तात आहे,” असे ते म्हणाले.
त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या विचारांचे समर्थन केले आहे, तर काही जणांनी या वक्तव्यावर वेगवेगळी मते मांडली आहेत.
रणबीर कपूरचा ‘रामायण’ चित्रपट पाहिला का?
दरम्यान, याच कार्यक्रमात रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाबाबतही जावेद अख्तर यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी आपण अद्याप हा चित्रपट पाहिलेला नसल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या मुलीने हा चित्रपट पाहिला असून, तिने चित्रपटाचे खूप कौतुक केल्याचेही जावेद अख्तर यांनी सांगितले.
Satara: रवींद्र डांगे यांचे दिग्दर्शन आणि रंगवलेला आप्पा अप्रतिम






