Red Soil Mining – पाटण तालुक्यातील शेतकर्यांची लाल मातीची वावरं हेरून उत्खननासाठी विकत घ्यायची. बेसुमार लाल माती उपसायची आणि ती कराड- कोल्हापूरपर्यंत पोहोचवायची. या लाल मातीतून अनेक जण लखोपती- करोडपती झाले. दुसरीकडे पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत आहे. तालुक्याच्या प्रत्येक भागात महसूल विभागातील कर्मचारी अधिकार्यांना हाताशी धरून चाललेला हा खेळ पर्यटनाला बाधा आणणारा असेल तर यावर नियंत्रण किंवा बंदी आणण्यासाठी पर्यटन मंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. पाटण तालुका निसर्गसंपन्न टिकवायचा आहे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मोठा करायचा आहे. त्यासाठी वाघ आणून सोडले आहेत, लोकप्रतिनिधींना पाटण तालुक्यात पर्यटन वाढवायचे आहे,असे एका बाजूला म्हणतात. दुसरीकडे कोयना काठ पोखरला जातोय, शेतकर्यांच्या शेतीत डोंगराएवढे खड्डे जाले आहेत. असे अवैध धंदे सुरु असताना यावर कारवाई होत नाही. महसूल विभाग कारवाई करत नसल्यामुळे लाल मातीचा लिलाव करणारे कोणाला घाबरत नाहीत. शंभूराज देसाई. रस्त्यावरुन लाल मातीचे भरुन चाललेले डंपर एकापाठोपाठ एक रस्त्यावरुन जातात आणि विशेष म्हणजे या डंपरवर लाल माती वाहतूक असे लिहिण्याचे धाडस केले जाते. महसूल किंवा पाटण तहसील प्रशासनामधील खालपासून वरपर्यंतच्या अधिकार्यांचे या लाल मातीवाल्यांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे रॉयल्टी भरल्याच्या नावाखाली तालुक्यात दिवसांगणिक लाल मातीची विक्री करणार्यांची संख्या वाढली आहे. या लाल मातीवाल्यांनी संघटनेच्या नावाखाली पाटण तालुक्यातील निसर्गसंपदेचा व्यापार मांडला आहे. पर्यटनमंत्र्यांनी बंधने आणावीत शंभूराज देसाई यांनी आमदार असताना पाटण तालुक्यातील लाल माती उत्खनन करणार्यांची आणि कोयना- केरा नदीपात्रात वीट भट्ट्या मांडणार्यांची पर्यावरण नियम व महसूल खात्याचा धाक दाखवून चांगल्या मुसक्या आवळल्या होत्या. आता तर शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यावरणाला मिळतेजुळते असे पर्यटन मंत्रिपद असून लाल मातीचा चाललेला हा धंदा ते रोखतील का, असा सवाल पर्यावरणवाद्यांकडून विचारला जातो. वीटभट्ट्याना लाल मातीची गरज पाटण तालुक्यातील वीट भट्ट्यांना लाल मातीची गरज आहे. ती त्यांना मिळाली पाहिजे. परंतु, असे न होता पाटण तालुक्यात लाल माती विक्रीचा धंदा बनला आहे. दिवसाढवळ्या, रात्री अपरात्री पाटण तालुका सोडून कराड- सातारा– सांगली- चिपळूण या भागात दुप्पट दराने लाल माती विक्री करुन अनेकांनी गाड्या घेतल्या, बंगले बांधले. उत्खनन करुन लाल मातीचे वाहतूक करणारे डंपर एकापाठोपाठ एक रस्त्यावरून जातात. हे धाडस होते. पाटणचा महसूल विभाग लाल माती माफियांची पाठराखण उगीच करत नाही, असा त्याचा अर्थ आहे.