Jaran Marathi Movie Teaser : गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘जारण’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रचंड व्हायरल झाले होते. यानंतर नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून, अवघ्या ५० सेकंदाच्या टीझरमध्ये थरकाप उडवणारी दृश्य एकामागून एक येत राहतात. एका विवाहितेच्या आयुष्यात आलेले विचित्र भय, तिच्या घरात घडणाऱ्या असामान्य घटना आणि त्यामागचे धक्कादायक गूढ या सगळ्यांची झलक टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. लपाछपीनंतर जारण या चित्रपटाचा टीझर अंगावर शहारे आणणारा आहे. हा चित्रपट बाझमी प्रॅाडक्शन्सने प्रस्तुत केला असून ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अनिस बाझमी हे पहिल्यांदाच जारण चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. येत्या ६ जून रोजी जारण रिलीज होणार असून प्रेक्षकांमध्ये टीझर पाहून चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. टीझरमधील अभिनेत्री अनिता दातेची लाल साडी, मोकळे केस, कपाळावर कुंकू व डोळ्यात अनोखी ऊर्जा असलेला पेहराव भीती निर्माण करणार आहे. ती जारणाची क्रिया करताना दिसत आहे. याचा अर्थ करणी करणे असा होता. हा चित्रपट करणी, अंद्धश्रद्धा, काळी जादू अशा गोष्टींवर आधारित असून कथा देखील त्याचा आधार घेऊन तयार करण्यात आली आहे. मराठीतील भय कथा लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले हृषीकेश गुप्ते यांनी जारणचे दिग्दर्शन केले आहे. तर अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांच्याही विशेष लक्षवेधी भूमिका पाहायला मिळणार आहेत.