चाकण, – खेड तालुक्याच्या इतिहासात आजपर्यंत विधानसभेच्या निवडणुकीत पक्षीय नेतृत्वाकडून विद्यमान आमदारांना ज्याज्या वेळी लाल दिवा मिळणार असल्याचे आश्वासन दिले जाते, त्या त्यावेळी लाल दिव्याचा उमेदवार पराभूत होतोय. असा अनुभव आहे.
विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महाविकास आघाडी व महायुतीकडून उमेदवार जाहीर झाले यामध्ये सर्वात आधी महायुतीकडून तत्कालीन आमदार असलेले दिलीप मोहिते यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी खेडचा उमेदवार घोषित केले. आणि याच बरोबर बोनस म्हणून यावेळेस दिलीप मोहितेंना निवडून द्या खेड तालुक्याला लाल दिवा मिळणार असल्याचे देखील सभेमध्ये जाहीर केले. मात्र दुर्दैवाने निवडणुकीमध्ये लाल दिव्याचे मानकरी ( ? ) असलेले महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांना पराभवाची चव चाखायला लागली.
तत्कालीन आमदार स्व. नारायणराव पवार हे सलग तीन टर्म आमदार असताना त्यांना देखील पक्ष नेतृत्वाने लाल दिवा मिळणार असल्याचे सांगितले मात्र त्या निवडणुकीमध्ये त्यांचा दिलीप मोहिते पाटील यांनी पराभव केला आणि खेड तालुक्याची लाल दिव्याची अपेक्षा धुळीस मिळाली. तद्नंतरच्या काळात दिलीप मोहिते यांनी सुद्धा तीन टर्म आमदारकी मिळविली यावेळी चौथ्यांदा त्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले मात्र नवख्या उमेदवाराने त्यांना पराभूत करत पुन्हा एकदा लाल दिवा हुलकावणी दिली. महायुतीचे उमेदवार म्हणून दिलीप मोहिते पाटील यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांनी महायुतीतील बर्याच नेत्यांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे गेले. त्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे महत्त्वाच्या नेत्यांनी दिलीप मोहिते पाटील यांचे व्यासपीठ आपल्या तुफान वक्तृत्व च्या जोरावर गाजवले. त्याच बरोबर दिलीप मोहिते पाटील यांच्या पक्षाच्या प्रमुख महिला नेत्या म्हणून ओळखल्या जाणार्या आणि पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यांनीही मोहिते पाटील यांच्या सोबत राहून गावोगावी प्रचार केला.
पण यातील भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आणि निर्मला पानसरे यांनी लोकाभिमुख पदे भूषविली आहेत. त्याच बरोबर त्यांचा त्यांच्या जिल्हा परिषद गटात यामागे मोठा प्रभाव असताना देखिल या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या गटातून मोहितेंची लिड कमी अशी झाली ही चिंतेचीच बाब म्हणावी लागेल. असंच काहीस चित्र निर्मला पानसरे यांच्या रेटवडी-पिंपळगाव गटात झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असताना स्वतःच्या गटात एकही गाव सोडा एक वाडी वस्ती ही न सोडता प्रत्येक ठिकाणी विकासात्मक कामे करून त्यांनी तालुक्यात मोठा विकासकमाचा डोंगर उभा केला होता.
यासाठी त्यांना महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन लाभले होते, मात्र त्यांनाही मोहिते यांना लिड मिळवून देण्यात अपयश आल्याने दोघांची राजकीय भविष्य आव्हानत्मकच असेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
शरद बुट्टेंची गटावरील पकड ढिली?
शरद बुट्टे पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात मोठी अभ्यास पूर्ण भाषणे केली पण त्यांच्या पाईट-पिंपरी जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तब्बल 13193 विक्रमी मताधिक्याची आघाडी मिळाली. यामुळे शरद बुट्टे पाटील यांच्या जिल्हा परिषद गटात असलेली पकड कुठे तरी सैल झाली की काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण शरद बुट्टे पाटील यांच्या सारख्या जेष्ठ अभ्यासू नेत्याची गटावर अभेद्य पकड असूनही विरोधी उमेदवाराला एवढी मोठी आघाडी मिळत असेल तर कुठे तरी यंत्रणेत गडबड झाल्याची चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकांची समीकरणाचा बारीक विचार करून शरद बुट्टे पाटील यांना राजकीय पाऊल उचलावे लागेल हेही तितकेच महत्वाचे राहील.
निर्मला पानसरेंची वाट धुसर
निवडणुकीत निर्मला पानसरे यांच्या जिल्हा परिषद गटात मोहिते पाटील यांना 2024 च्या विधानसभा उच्चांकी मताधिक्य मिळेल, अशी संपूर्ण तालुक्याला आशा होती. आणि त्या गटात मोठे मताधिक्य मिळाले असते तर नक्कीच झालेला पराभव कमी फरकाने झाला असता किंवा त्यांच्या कामावर समाधान तरी व्यक्त करता आलें असते. पण निर्मला पानसरे यांनी ज्या जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व केले त्या गटात महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांना तब्बल 6521 मतांची आघाडी आहे. त्यामुळे कुठे तरी तालुक्यात प्रचार करताना पानसरे यांचे स्वतःच्या जिल्हा परिषद गटात दुर्लक्ष झाले एवढेच नाही तर त्यांच्या बहुळ गावातही बाबाजी काळे यांना 484 मतांची आघाडी आहे. ही निर्णायक आघाडी निर्मला पानसरे यांच्यासाठी भविष्यातील राजकीय वाट धूसर करणारी असेल यात शंका नाही.
गोरे कुटुंबही प्रभावहीन
याउलट चाकण शहरात उघडपणे गोरे कुटुंबाने महायुतीचा धर्म तोडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम केले पण त्यांचा कोणताच करिष्मा चाकण शहरात दिसला नाही. वरिष्ट पातळीवरील राजकीय बदलला सोयीस्करपणे स्वीकारून आपली भूमिका सतत बदलणार्या पुढर्यांनाही बोध घेऊन वाटचाल करावी लागणार आहे. आजच्या काळातील या सर्व राजकीय परिस्थितीचा विचार करता तालुक्याच्या बर्याच नेत्यांचे राजकीय भविष्य आगामी काळात पणाला लागणार हेच चित्र यावरून स्पष्ट होते .