राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती लवकरच

पाठपुरावा सुरूच : मुंबईतील बैठकीत शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन
अनुकंपा भरतीबाबत तत्काळ कार्यवाही होणार
पुणे – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाबाबत मागील सरकारने घातलेला घोळ दुरुस्त करून तात्काळ भरती सुरू करण्याबाबतचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीसाठी औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, अपर सचिव वंदना कृष्णा, उपसचिव चारुशीला चौधरी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील, अवर सचिव रासकर, शिक्षण आयुक्त कार्यालयातील अधीक्षक के.टी.ढाळे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटना महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, मुंबई विभागीय कार्यवाह राजू रणवीर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गोरे आदी उपस्थित होते. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबत आउटसोर्सिंग करण्यास या बैठकीत संघटनेच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला.
नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा 10, 20, 30 वर्षांनंतरच्या लाभाचा निर्णय कालमर्यादा घालून जाहीर करण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले. चोवीस वर्षांच्या लाभाबाबत न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा भरती बाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले. अनुकंपा व 10,20,30 वर्षाच्या नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा विषय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सभागृहात देखील जाहीर केला आहे, अशी माहिती शिवाजी खांडेकर यांनी दिली आहे.





