पिंपरी | लोणावळा नगरपरिषदेची विक्रमी कर वसुली

लोणावळा (वार्ताहर) – लोणावळा नगरपरिषदेकडे 2023 – 2024 या वर्षाच्या अखेरीला मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर या पोटी तब्बल 37 कोटी 52 लाख रुपये जमा झाले आहेत. चालू वर्षात करापोटी जमा झालेली ही रक्कम विक्रमी असून आजवर एकाच वर्षात जमा झालेला हा सर्वाधिक कर आहे. मालमत्ता कारापोटी नगरपरिषदेला 28 कोटी 70 लाख रुपये तर पाणीपट्टी करापोटी 8 कोटी 82 लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
लोणावळा शहरात एकूण 20977 मालमत्ताची नोंदणी नगर परिषदेकडे झालेली आहे. या सर्व मालमत्तांच्या घरपट्टी करापोटी परिषदेला एकूण 38 कोटी 15 लाख 41 हजार रूपये वसुली करावयाची होती.
त्यापैकी आत्तापर्यंत 28 कोटी 70 लाख रुपये अर्थात एकूण 73 टक्के वसुली झाली आहे. तर पाणीपट्टी कराच्या थकीत 9 कोटी.93 लाख पैकी 8 कोटी 82 लाख रूपये अर्थात 88 टक्के रक्कम वसुल झाली आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा नगर परिषदेने करवसुलीसाठी मोठी मोहीम राबवली होती. त्याअंतर्गत नगरपरिषद वसुली पथकाने २१ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे.
याशिवाय कर भरण्यासाठी मिळकतदारांना अनेक वेळा आवाहन केले असून नोटीसा पाठविल्या. असे असतानाही ज्यांनी कराची रक्कम भरली नाही, अशा मिळकतदारांच्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत.
शिवाय नळ जोड बंद करण्यात आले आहेत. जप्तीची कारवाई व दंडात्मक व्याज टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कराची रक्कम त्वरीत भरावी, असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी केले आहे.





