पवना धरण परिसरात विक्रमी पावसाची नोंद

पिंपरी – राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 374 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरण साठ्यात 13.67 टक्के इतकी वाढ झाली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 67.80 टक्के इतका झाला आहे.
बुधवारी पवना धरणात 54.13 टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र धरण क्षेत्रात आज (गुरुवारी) सकाळी सहा वाजेपर्यंत 24 तासांत 374 मि.मी. इतका विक्रमी पाऊस झाला आहे. तर यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत एक हजार 596 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे एकाच दिवसात धरणातील पाणीसाठ्यात 13.67 टक्के इतकी वाढ होऊन सध्या धरणातील पाणीसाठा 67.80 टक्के इतका झाला आहे.
गेल्यावर्षी आजच्याच दिवशी धरणात 65.19 टक्के इतका पाणीसाठा होता. तर गेल्यावर्षी आजच्याच दिवसापर्यंत एक हजार 407 मि.मी. पाऊस झाला होता.
अजूनही पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच कासारसाई धरणातून साडेतीन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने सध्या पवना नदी दुथडी भरून वाहत आहे.


