विक्रमी जीएसटी संकलन: एप्रिलमध्ये २.३७ लाख कोटी रुपये झाले जमा

Record GST collection – भारताची अर्थव्यवस्था बळकट असल्याचे जीएसटी संकलनाच्या आकडेवारीवरून दिसून येते. विविध राज्यातील उत्पादकता वाढत असल्यामुळे विकास सर्वसमावेशक होत असल्याचे हे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनात तब्बल 12.6 टक्क्यांनी वाढ होऊन हे संकलन 2.37 लाख कोटी रुपयावर गेले आहे. हा एक विक्रम आहे.
या अगोदर एप्रिल 2024 मध्ये 2.10 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. तर मार्च 2025 मध्ये 1.96 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. कर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशांतर्गत व्यवहारातून झालेले कर संकलन 10.7 टक्क्यांनी वाढून 1.9 लाख कोटी रुपये झाले आहे. तर आंतरराष्ट्रीय व्यापारातून झालेले कर संकलन 20.8 टक्क्यांनी वाढून 46,913 कोटी रुपये झाले आहे.
त्यामुळे जागतिक परिस्थिती बिघडत असतानाच भारतातची सेवा आणि वस्तूची आयात निर्यात वाढत असल्याचे यातून स्पष्ट होते. कर परतावा वाढून 48.3 टक्क्यांनी वाढून 27,341 कोटी रुपये झाला आहे. त्यामुळे निव्वळ कर संकलन 9.1 टक्क्यांनी वाढून 2.09 लाख कोटी रुपये झाले आहे.
कर विश्लेषकांनी सांगितले की, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात साधारणपणे कर संकलन वाढत असते. मात्र यावर्षी विक्रमी कर संकलन झाले आहे. त्यामुळे भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी काळातही कर संकलन वाढत जाण्याची शक्यता आहे. भारताने अर्थव्यवस्थेतील शिस्त न सोडल्यामुळे आपण ही कामगिरी करू शकलो आहोत.
सर्व राज्यांची कामगिरी चांगली –
एप्रिल महिन्यात झालेले कर संकलन सम प्रमाणात झाले आहे. सर्व राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे. अगोदर फक्त मोठी राज्य चांगली कामगिरी करत होती. याचा अर्थ सर्वसमावेशक विकास होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. केंद्राच्या वतीने झालेले कर संकलन 48,634 कोटी रुपये, राज्याच्या वतीने झालेले कर संकलन 59,352 कोटी रुपये, संयुक्त कर संकलन 69,504 कोटी रुपये तर अधिभार संकलन 12,293 कोटी रुपये झाले आहे.

