मुंबई : वारंवार नियम धाब्यावर बसवणा-या महाराष्ट्रातील ८९ फार्मसी कॉलेजची मान्यता अखेर रद्द करण्यात आली आहे. त्यात नागपूर, ठाणे, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील नामांकित फार्मसी कॉलेजचा समावेश आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना यंदा डी. फार्मच्या ७९ आणि बी. फार्मच्या १८ कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार नाही. राज्य तंत्रशिक्षण विभागाने हा धाडसी निर्णय घेतला. फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय)च्या शिफारशींनंतर ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेल्या तपासणीत कॉलेजकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर, शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी राज्य सरकारने पीसीआयला या महाविद्यालयांमध्ये अभाव, अपूर्ण प्रयोगशाळा, अपुरी पायाभूत सुविधा आणि पात्र शिक्षक आणि प्राचार्यांचा अभाव यासह गंभीर कमतरता आढळून आल्या. या कमतरतांमुळे असे दिसून आले की, अनेक महाविद्यालये केवळ नावापुरती कार्यरत होती, तर त्यांची शैक्षणिक गुणवत्ता खूपच खराब होती. या महाविद्यालयांमध्ये अग्निसुरक्षा प्रमाणपत्रांचा अभाव, इमारत भोगवटा प्रमाणपत्रांचा अभाव यामुळे या कॉलेजची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली. या शिफारशीच्या आधारे, २०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत या संस्थांना सहभागी होण्यास मनाई करणारे परिपत्रक जारी करण्यात आले. दरम्यान, राज्यात गेल्या काही वर्षांत फार्मसी अभ्यासक्रमाची महाविद्यालये भरमसाट वाढली होती. त्यामुळे फार्मसी कॉलेजांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या होत्या. तसेच अनेक महाविद्यालयांना विद्यार्थीही मिळू शकले नव्हते. त्यामुळे भरमसाट वाढलेल्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेचाही अभाव होता. त्यामुळे त्यांच्यावर चाप आणण्याची मागणी होत होती.