मुंबई : फेसबुक पोस्टवरून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, यासंदर्भात स्वत: पंकजा मुंडे आता मौन सोडले आहे. चुकीच्या बातम्यामुळे मी व्यथित झाले आहे.
दबावतंत्रासाठी मी फेसबुक पोस्ट केली नाही. मी पक्षाची सच्ची कार्यकर्ती आहे. बंडखोरी माझ्या रक्तात नाही. पक्षाशी मी बांधील आहे. तसेच भाजप पक्ष सोडण्याबाबत अफवा पसरवण्यात आल्याचे सांगत माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. येत्या 12 तारखेला गोपीनाथ गडावर मी सर्व भावना माझ्या कार्यकत्ऐर्यांशी बोलून दाखविणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर भाजपामध्ये मोठा भूंकप झाला. त्यातच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगत गोंधळात भर घातली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांनी सोमवारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन, पंकजा मुंडे यांच्या पक्ष बदलाच्या चर्चांमध्ये कुठलंही तथ्य नाही. त्या कायम भाजपसोबतच राहणार आहेत, असे स्पष्टीकरण केले.
मंगळवारी पंकजा यांच्या रॉयलस्टोन या सरकारी निवासस्थानी भाजपाचे नेते विनोद तावडे, प्रा.राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेउन चर्चा केली. त्यानंतर विपर्यस्त बातम्यांमुळे पंकजा व्यथित असल्याची प्रतिक्रिया तावडे व शिंदे यांनी दिली आहे.
पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या, 2014 च्या निवडणुकीआधी देखील मी मुख्यमंत्री बनणार अशा बातम्या पसरविल्या गेल्या. त्यानंतर मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा बातम्या पेरण्यात आल्या. आता देखील माझ्या फेसबुक पोस्टवरून विपर्यस्त बातम्या सुरू आहेत. मी कधीच पदासाठी दबावतंत्राचा वापर केला नाही, माझ्या ते रक्तातही नाही. पण मला आता कोणतेच पद मिळू नये यासाठीच तर हे प्रकार सुरू नाहीत ना? अशी शंका माझ्या मनात आहे. माझे वडील गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी मोठे कार्य केले.
मी देखील अगदी साध्या पदापासून ते आमदार, मंत्री अशी अनेक पदे भूषविली. आताच्या निवडणुकीतही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पक्षाच्या इतर उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. पण अशा बातम्या चालल्याने निश्चितच दु:ख होते. सध्या मी आत्मचिंतन करत आहे. मला त्यासाठी थोडा वेळ हवा आहे. 12 तारखेला गोपीनाथ गडावर माझ्या सर्व भावना मी व्यक्त करणारच आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.