इस्लामाबाद -पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यापुढे विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव हाणून पाडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशातच त्यांच्या पक्षाच्याच 24 खासदारांनी बंडाचा पवित्रा स्वीकारला आहे. त्यामुळे इम्रान यांचे आसन डळमळीत बनल्याचे संकेत मिळत आहेत.
पाकिस्तान सध्या आर्थिक डबघाईला आला आहे. तशातच प्रचंड महागाईमुळे तेथील जनता मेटाकुटीला आली आहे. त्या स्थितीला इम्रान यांचे सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षांच्या सुमारे 100 खासदारांनी पाकिस्तानी संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला आहे.
त्यावर मतदान घेण्यासाठी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे म्हणजे नॅशनल असेंब्लीचे अधिवेशन 21 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अविश्वास प्रस्तावावर 28 मार्चला मतदान होऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
अविश्वास प्रस्तावाने इम्रान यांची चिंता वाढवली असतानाच स्वपक्षीय खासदारांचे बंड त्यांची झोप उडवणारे ठरले आहे. इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या दोन डझन खासदारांनी सरकारविरोधात मतदान करण्याचा इशारा दिला आहे. स्वपक्षाच्या सरकारच्या धोरणांविषयी ते जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत.
अधिवेशन सुरू होण्याआधी एकत्र येऊन त्यांनी इस्लामाबादमधील सिंध हाऊसमध्ये मुक्काम ठोकला आहे. ते हाऊस सिंध सरकारच्या अखत्यारीत येते. सिंध प्रांतात पाकिस्तान पीपल्स पार्टीची (पीपीपी) सत्ता आहे. इम्रान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्यांमध्ये पीपीपीच्या खासदारांचाही समावेश आहे. त्यामुळे पीटीआयच्या बंडखोर खासदारांनी सिंध हाऊसमध्ये ठोकलेल्या मुक्कामातून ते मतदानावेळी विरोधकांना साथ देण्याच्या मूडमध्ये असल्याचे सूचित होत आहे.