मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, भाजपने निवडणुकांपूर्वीच मोठी आघाडी घेतल्याचा दावा केला आहे. कल्याण-डोंबिवलीसह काही महापालिकांमध्ये महायुतीचे सुमारे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. मनसेने न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली असतानाच काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करत भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात गट सक्रीय झाल्याचा दावा केला. महसूलमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीचा उल्लेख करत भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याचा संदर्भ देत पटोले यांनी नाव न घेता भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनाही टोला लगावला. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत त्यांना बदलण्याची मागणीही त्यांनी केली. “विधिमंडळाची परंपरा, लोकशाही आणि न्याय यांची भूमिका जपली पाहिजे. मात्र सध्या राजकारण म्हणून वावरणेच शक्य नाही,” असे पटोले म्हणाले. निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आधी चौकशीची भूमिका घेतली आणि नंतर यु-टर्न घेतल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. “राज्याचे निवडणूक आयुक्त भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. हे लोकशाहीसाठी घातक आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. शेतकरी प्रश्नावरही टीका शेतकऱ्यांच्या कर्जावरील स्टँप ड्युटी माफीच्या निर्णयावरूनही पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला. निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही घोषणा असून, आधी केली असती तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता, असे ते म्हणाले. “भाजपमध्ये भविष्यात मोठा स्फोट होईल. मुख्यमंत्री विरोधात गट सक्रीय झाला आहे. त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत,” असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. दरम्यान, सरकार प्रचारात गुंतले असून जनता वाऱ्यावर असल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याची टीका करत, “सत्तेचा माज भाजपच्या नेत्यांच्या डोक्यात गेला आहे. जनतेत प्रचंड रोष असून त्याचा उद्रेक होईल,” असा इशाराही नाना पटोले यांनी दिला. काँग्रेस हा सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.