इंदापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम व दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. “समता, बंधुता आणि एकतेच्या मार्गाने चालतच आंबेडकरांचे स्वप्न साकार होऊ शकते, असा संदेश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला. मंगळवारी (दि. १४) गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी रॅलीला प्रारंभ करताना ते बोलत होते. “डॉ. आंबेडकरांनी दिलेले विचार केवळ स्मरणात न ठेवता, ते आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. समाजात न्याय, समता आणि बंधुता रुजवूनच खरी प्रगती साधता येईल,” असेही त्यांनी नमूद केले. डॉ. आंबेडकरनगर येथील जेतवन बुद्धविहारात पूजन करून रॅलीला सुरुवात झाली. ‘जयभीम’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. निळे झेंडे फडकवत आणि मार्गावरील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत ही रॅली शहरातील विविध भागांतून मार्गक्रमण करत होती. नगरपरिषदेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार जीवन बनसोडे, मुख्याधिकारी रमेश ढगे, नगराध्यक्ष भरत शहा, उपनगराध्यक्ष बाळा ढवळे, गटनेते शकील सय्यद, संदीपान कडवळे, तानाजी धोत्रे, अर्शाद सय्यद, बाळासाहेब मखरे, अफसर मोमीन, विकास साबळे, बापू मखरे आदी उपस्थित होते. हेही वाचा : India-US Talks: “आम्हा सर्वांचं तुमच्यावर प्रेम आहे”; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प– पीएम मोदी यांच्यात 40 मिनिटे संवाद, होर्मुझ नाकेबंदी व पश्चिम आशियातील तणावावर चर्चा