“शिवतीर्थावरचा खरा शिवसेनेचा दसरा मेळावा; बाकी आता डुप्लिकेट…”; संजय राऊतांचा CM शिंदेंना टोला

Sanjay Raut | शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून वेगवेगळे दसरा मेळावे होऊ लागले. यंदाचा ठाकरे गटाचे दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर सायंकाळी होणार आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यापूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
“बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची सुरुवात केली. दसऱ्याला एक विचारांचं सोनं त्यांनी दिलं. दसऱ्याच्या मुहूर्तावर देशाला महाराष्ट्र विचाराचं सोनं देत राहिला. ती परंपरा उद्धव ठाकरे यांनी जपली आहे. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण शिवसेनेचाच म्हणाल तर तो शिवतीर्थावरचा मेळावा आहे. बाकी आता डुप्लिकेट लोक खूप येत आहेत. मेळावे करत आहे,” असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.
आजचा दसरा मेळावाविधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाचा
“शिवसेना कोणाची हे निवडणुकीनंतर समोर येईल. निवडणूक आयोग ठरवू शकत नाही की शिवसेना कोणाची आहे. कारण निवडणूक आयोग काही दिवसांनी निवृत्त होईल आणि जो मोदी शाहांच्या मेहरबानी वरच जगतो आणि चालतो. शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा या राज्यातील जनतेने निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे मुंबईतला आजचा दसरा मेळावा हा उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक आहे. आज विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात येईल. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला. आता विधानसभेत सुद्धा मोठे यश मिळेल,” असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
“आज विचाराचे रणशिंग फुंकले जाईल आणि या रणशिंगापुढे पिपाण्या चालणार नाहीत. ज्या पिपाण्या आज वाजतील त्यांना काही काही अर्थ नाही. आज महाराष्ट्रातून आणि देशातून लाखो लोक येतील. नक्कीच आज एक दिशा महाराष्ट्राला लागेल. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठ्या विजयाची मानकरी ठरली आणि विधानसभा सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने जिंकू,”‘ असेही संजय राऊत म्हणाले.
“आमचा धनुष्यबाण मोदी आणि शाह यांच्या मदतीने चोरण्यात आला. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री चोरांना मदत करत असतील तर आज देश चोरांच्या हाती आहे असे म्हणावे लागेल. आमच्याकडे मशाल आहे, मशाल सुद्धा सगळ्यात मोठं हत्यार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात मशालीचा वापर फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शिवरायांपासून मशालीला महत्त्व आहे आणि तीच मशाल आज आमच्या हातात आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले.
हेही वाचा:





