गतवर्षी उद्भवलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही : अजित पवार पुणे – विभागातील पुण्यासह सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्हे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करण्यास सज्ज आहे. गतवर्षी उद्भवलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मागील वर्षी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने यावर्षी महसूल, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. 2019 मध्ये पुणे विभागातील 38 तालुक्यांतील 727 गावांमधील 2 लाख 6 हजार 452 कुटुंबे अतिवृष्टीमुळे बाधित झाली. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 2 एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) टीम पुरविण्याबाबत विनंती केली आहे. नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास सक्षमपणे मुकाबला करता यावा, यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच महापालिकेकडील नियंत्रण कक्षामध्ये आवश्यक ती साधन सामग्री उपलब्ध केली आहे.