Pune : प्रभात’शी वाचकांचे नाते आणखी दृढ

पुणे : शतकाकडे वाटचाल करणाऱ्या दैनिक ‘प्रभात’चा ९४ वा वर्धापनदिन सोहळा रविवारी, दि. ५ जानेवारी रोजी सायंकाळच्या रम्य वातावरणात साजरा झाला. शनिवार पेठेतील न्या. महादेव गोविंद रानडे बालक मंदिराच्या प्रांगणात या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या स्नेहमेळ्यातून दैनिक ‘प्रभात’ विषयी असलेले प्रेम वाचक, स्नेही, राजकारणी, समाजकारणी, विधिज्ञ, शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक मान्यवरांच्या भेटीतून वृद्धिंगत झाले. पुणे, पिंपरी चिंचवड शहरांतील सर्वसामान्य वाचकांपासून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून ‘प्रभात’च्या वाटचालीला यावेळी शुभेच्छा दिल्या. सायंकाळी सहा वाजता स्नेहमेळाव्याला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ किरण कोठाडिया, भगिनी निवेदिता बँकेच्या अध्यक्षा सीए रेवती पैठणकर, दैनिक ‘प्रभात’चे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, ॲड. भगवानराव साळुंखे, दैनिक ‘प्रभात’चे कार्यकारी संपादक अविनाश भट यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने प्रारंभ झाला. यावेळी तुकाराम दैठणकर, नितीन तुकाराम दैठणकर, श्रीयांश नितीन दैठणकर यांच्या सनईवादनाने, आदित्य पंडित यांचे तबलावादन, रमेश काळे यांच्या हार्मोनियमवादनाच्या सुरावटींनी ही सायंकाळ स्वरमय झाली.
गेल्या नऊ दशकांपेक्षा अधिक काळ व्यासंगी आणि ध्येयनिष्ठ पत्रकारितेच्या माध्यमातून दैनिक ‘प्रभात’ने राज्यभरातील वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. पत्रमहर्षी ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार वृत्तांकन आणि विश्लेषण भूमिकांच्या माध्यमातून ‘प्रभात’ने अनोखी ओळख सदैव जपली आहे. वाचक आणि हितचिंतकांच्या सदिच्छांच्या जोरावरच ‘प्रभात’ची वाटचाल शतकपूर्तीकडे तितक्याच प्रगल्भतेने सुरू आहे. या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने, आमदार बापू पठारे, आमदार शंकर मांडेकर
युवा उद्योजक पुनीत बालन, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, संदीप खर्डेकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, सेंट मीरा कॉलेजच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. सुवर्णा देवळाणकर, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ संदीपसिंह गिल्ल, पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, मघराज राठी, अजित खाडीलकर, आदित्य शहा, प्रकाश शहा, ईश्वर दिघे, संजय बर्वे, मुख्य अभियंता (महावितरण) राजेंद्र पवार, बाजार समितीचे माजी प्रशासक मधुकांत गरड, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ॲड. राजेंद्र उमाप, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा, आरटीओचे वरिष्ठ अधिकारी जगदीश कांदे यांच्यासह पत्रकारिता-जाहिरात-जनसंपर्क यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. जुन्या-नव्या पिढीचा संगमही या मेळाव्यात लक्षणीय होता. वाचकांचे ‘प्रभात’सोबत असलेले नाते या मेळाव्याच्या माध्यमातून अधिक दृढ झाल्याचे यानिमित्त दिसून आले. ‘प्रभात’वर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून आपल्या सदिच्छादेखील व्यक्त केल्या.





