समाज माध्यमांवर प्रचंड ऍक्टिव्ह असणारे नेटकरी कधी आणि कोणाला धारेवर धरतील याचा काही नियम नाही. याचाच प्रत्यय आज ट्विटरवर झळकत असलेल्या #रामदेव_बाबा_पैसे_निकालो या ट्रेंडच्या माध्यमातून येतोय. त्याचं झालं असं की, सध्या देशावर कोरोनाचे संकट घोंघावत असून आशा संकटसमयी देशाला आर्थिक मदत करणाऱ्या दानशूरांचे सध्या सोशल मीडियावर चांगलेच कौतुक सुरु आहे. मात्र ज्या धनदांडग्यांनी देशाला मदत करण्याचे औदार्य अद्याप दाखवले नाही अशांचा नेटकरी चांगलाच क्लास घेताना दिसतायेत. अशातच आज नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देशातील सुप्रसिद्ध योगगुरू व पतंजली समूहाचे मालक स्वामी रामदेव बाबा आले असून नेटकऱ्यांनी त्यांच्याकडे देशाला आर्थिक मदत करण्याचे आगळेवेगळे आवाहन केले आहे. नेटकरी सध्या ट्विटरवर #रामदेव_बाबा_पैसे_निकालो हा हॅशटॅग वापरून ट्विट करत असल्याने हा हॅशटॅग ट्रेंडिंग लिस्टमध्ये एक नंबरवर झळकतोय. दरम्यान, याच हॅशटॅगचा वापर करून रामदेव बाबा यांचे समर्थक देखील बाबांनी कोरोना संकटाशी लढण्यासाठी कशाप्रकारे सहाय्य केलंय याबाबतची माहिती देताना दिसतायेत. आता रामदेवबाबांच्या #रामदेव_बाबा_पैसे_निकालो या हॅशटॅग प्रकरणावरून देशातील धनदांडग्यांनी ‘नेकी करो और दारिया में डालो’ ही वृत्ती सोडून ‘नेकी करो और फेसबुक, ट्विटरपर डालो’ ही वृत्ती अवलंबवायला हवी की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.