ओपन चॅलेंजनंतर राजन पाटलांचा माफीनामा मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायत निवडणुकीसाठी भाजपाकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. प्राजक्ता पाटील या निवडणुकीत निवडून येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर पाटील कुटुंब, त्यांचे समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी नगर पंचायत कार्यालयाबाहेर जल्लोष केला. यावेळी राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिलं. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर राजन पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत अजित पवारांची माफी मागितलीय.. “मी आजवर जे वैभव उभं केलं आहे त्यात शरद पवार व अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. आमच्या मुलाकडून नकळत, उत्साहाच्या भरात, भावनेच्या ओघात अपशब्द निघाला असेल. त्याबद्दल मी अजित पवारांची पूर्ण अंतःकरणापासून दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची क्षमा मागतो. मी त्यांच्यापुढे नतमस्तक होतो आणि आता हा विषय थांबवावा अशी विनंती करतो.” २) पुण्यात स्लॅब कोसळून दोन जखमी पुण्यात एका हॉटेलचे नूतनीकरण सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. शहरातील ढोले पाटील रस्ता, हॉटेल कपिलामध्ये स्लॅब कोसळून दोन जण ढिगाऱ्याखाली गाढले गेल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान दाखल झाले अन् बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले. स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन्ही व्यक्तींना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले. सचिन चव्हाण व कृष्णा (दोघेही रा. येरवडा) अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान, जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अग्निशमन दलाचे जवानांनी वेळेत आणि रेस्क्यू टुल्स वापरत केलेल्या कामगिरीने अडकलेल्या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. यावेळी पुणे मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग उपायुक्त व बांधकाम विभाग कर्मचारी तसेच ढोले पाटील क्षेञिय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस दलाचे सहकार्य मिळाले. ३) एकनाथ शिंदे दिल्लीदरबारी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले. राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढलेला असताना शिंदे दिल्लीत जावून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी काल कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यानंतर शिंदेंचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. भाजपकडून शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश दिला जात असल्याने शिंदेंच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीला रवाना झालेले शिंदे उद्या बिहारला जाणार आहेत. उद्या पाटण्यात एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. आपण एनडीएसोबत भक्कमपणे असल्याचा संदेश पाटणा दौऱ्यातून शिंदे देतील, अशी आशा राजकिय वर्तुळातून व्यक्त होत आहे. ४) एसटी बस थेट प्रवाशांच्या गर्दीत घुसली नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस स्थानकावर एसटी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात काहीजण जखमी झाले असून एकाचा जगीचा मृत्यू झाला आहे. व्हिडिओमध्ये असं दिसतंय कि, प्रवासी बस स्थानकाच्या फलटावर बसले होते. नेहमीप्रमाणे बस आली. मात्र ती न थांबता थेट प्रवाशांच्या अंगावर गेली. यामध्ये खाली बसलेले चार ते पाच जण जखमी झाले असून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. मात्र हा अपघात कशामुळे झाला? बस ड्रायव्हरने मद्यपान केले होते का? किंवा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का? असे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. ५) नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री बिहारमधील नवीन एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा उद्या (20 नोव्हेंबर) पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर होणार आहे. त्यापूर्वी, आज NDA ची महत्वाची बैठक पार पडली, ज्यात नितीश कुमार यांना विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले आहे. म्हणजेच, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार, यावर आज अखेर शिक्कामोर्तब झालय. भाजप नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, जो एकमताने मंजूर करण्यात आला. आता नितीश कुमार राजभवनात जाऊन राजीनामा देतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील. तर, उद्या सकाळी भव्य शपथविधी सोहळ्यात 10 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिंहा उप-मुख्यमंत्रिपदाची शपत घेतील. ६) भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात बोलताना एक मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्यांनी याठिकाणी, “ज्याला भारताचा अभिमान आहे तो हिंदू आहे. ” असे म्हटले आहे. भागवत यांनी हिंदू धर्माचे वर्णन केवळ धार्मिक नाही तर एक सभ्यता ओळख म्हणून देखील केली आहे. त्यांनी भारत आणि हिंदू एकच आहेत यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, “हिंदू हा केवळ एक धार्मिक शब्द नाही तर हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेत रुजलेली एक सभ्यता ओळख आहे”. “भारत आणि हिंदू समानार्थी आहेत. “हिंदू राष्ट्र” होण्यासाठी भारताला कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही. त्याचे सभ्यता स्वरूप आधीच हे प्रतिबिंबित करते.”असे म्हटले आहे. ७) चीनने कारवाई केली, तर जपानच्या अस्तित्वाला धोका जपान आणि चीनमधील राजकीय अविश्वास हा दीर्घकाळापासून आहे, परंतु जपानच्या नवीन पंतप्रधानाची निवड झाल्यापासून संबंध एका नवीन पातळीवर पोहोचले आहेत. जपानी पंतप्रधान साने ताकाची यांनी संसदेत बोलताना, “जर चीनने तैवानविरुद्ध लष्करी कारवाई केली तर ते जपानच्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण करेल आणि टोकियोला प्रत्युत्तरात्मक लष्करी कारवाई करण्यास भाग पाडले जाऊ शकते.” असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण आशिया-पॅसिफिक प्रदेशात खळबळ उडाली. त्यांच्या विधानानंतर चीनने एक कडक विधान जारी केले. सरकारी प्रवक्ते, माध्यमे आणि कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न प्लॅटफॉर्मने जपानच्या विधानाला चिथावणीखोर आणि प्रादेशिक शांततेला धोका असल्याचे म्हटले आहे. ८) मकरंद अनासपुरे यांनी घेतली आयुष्मान खुराणा यांची भेट मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी कलाकार अभिनेते मकरंद अनासपुरे यांची बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणासोबत भेट झाली. या भेटीदरम्यानचा एक फोटो शेअर करत मकरंद अनासपुरे यांनी आयुष्मानचे कौतुक केले आहे. त्यानंतर त्यांनी एक खास पोस्ट लिहिली, ते म्हणाले, “आयुष्मान भवः मला आयुष्मान खुराणाला भेटणे खूप आनंददायी होते. त्याची खरी नम्रता त्याच्या उल्लेखनीय प्रतिभेशी जुळते.” सोबतच शेअर केलेल्या फोटोमध्ये आयुष्मान सूटमध्ये दिसत आहे. त्याने डोळ्यांवर गॉगल लावला आहे, तर मकरंद अनासपुरे यांनी निळ्या रंगाचा शर्ट घातला असून त्यावर जॅकेट घातले आहे. मकरंद अनासपुरे यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे, तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. ९) सोशल मीडिया हा अविभाज्य भाग झालाय आम्हा कलाकारांच्या आयुष्याचा सोशल मीडिया हा अविभाज्य भाग झाला आहे. आम्हाला ते आवडो न आवडो, पण आम्हाला त्या माध्यमावर हजेरी लावावी लागते. नुसती हजेरी नाही तर ‘आम्ही कसे कालसुंसगत आहोत’ हेदेखील पटवून द्यावं लागतं. काही वर्षांपूर्वी आधी कलाकार आणि नंतर त्यांच्या ‘पब्लिसिटी’चा मुद्दा यायचा. आता कलाकार राहिले मागे आणि ‘पब्लिसिटी’ हा मुद्दा पुढे रेटला जातो, असे परखड मत बॅालिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शाह हिने व्यक्त केले आहे. पुढे अभिनेत्री म्हणाली, आधी कलाकारांना पब्लिसिटीमध्ये समाविष्ट करून घेतलं जायचं, आता पब्लिसिटीमध्ये कलाकारांचा समावेश केला जातो, हे खटकणारं असलं तरी वास्तव आहे, असे रोखठोक भाष्य अभिनेत्रीने सध्याच्या परिस्थितीवर केले आहेत. १०) रोहित शर्माला मोठा झटका टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माला आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेआधी मोठा झटका बसला आहे. रोहित शर्माची वनडे रॅकींगमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेरी मिचेल याने रोहित शर्माला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. रोहित शर्माच्या नावावर सध्या 781 गुण आहेत तर डेरी मिचेल 782 गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यामुळे अवघ्या एका गुणाने रोहित शर्माने अव्वल स्थान गमावलं आहे.