१) मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौरपदावरून राजकीय रस्सीखेच तीव्र झाली आहे. भाजप-शिंदेसेनेला काठावरचे बहुमत मिळाल्यानंतर सुरुवातीच्या अडीच वर्षांसाठी महापौरपदावर दावा करण्याची तयारी एकनाथ शिंदे करत असल्याची चर्चाय. पडद्यामागे गुप्त हालचाली सुरू असून ठाकरे गटाकडून शिंदेसेनेच्या काही नगरसेवकांशी संपर्क साधल्याची माहिती मिळतेय. दगाफटका टाळण्यासाठी एकनाथ शिंदेनी आपल्या नगरसेवकांना वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले असल्याचे सांगितले जातेय. भाजपला सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाची गरज असल्याने महापौरपदाची अडीच-अडीच वर्षांची मागणी शिंदे करू शकतात. या सगळ्या घडामोडींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. २) शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदूरबार शहर पोलिसांनी अटक केलीय. दरोडा आणि अॅट्रोसिटी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. अटकेनंतर चौधरी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ही कारवाई उपनगराध्यक्षपदाच्या विजय मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. मिरवणुकीनंतर चौधरी यांच्या घरावर तोडफोड झाली होती, त्यानंतर दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले होते. माजी मंत्री अनिल पाटील यांनी चौधरी यांच्यावर गंभीर आरोप करत नंदूरबारमध्ये गुंडशाही सुरू असल्याचा आरोप केला होता. या अटकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील पोलिस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलंय. ३) पुण्यात सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पुणे शहरात होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी, १९ जानेवारी रोजी पुणे महानगरपालिकेच्या ठराविक क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतलाय. या दिवशी स्पर्धेतील ‘प्रोलॉग रेस’ आयोजित करण्यात येणार असून, फर्गसन कॉलेज रोड, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता तसेच त्यांना जोडणारे उपमार्ग सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. संभाव्य वाहतूक कोंडी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता खबरदारीचा उपाय म्हणून शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. ४) मुंबईत जनतेने भाजपाला ऐतिहासिक मतं दिली : नरेंद्र मोदी मुंबई तसेच महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं भाष्य केलंय. “दोन दिवसांअगोदर महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत महापौर आणि नगरसेवक पदाच्या निवडणुका झाल्या. मुंबई हे जगातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर आहे. त्या शहरातही जनतेने भाजपाला पहिल्यांदाच ऐतिहासिक आणि विक्रमी मतं दिली, असं मोदी म्हणालेत. ते आसाम राज्यातील काझीरंगा येथे एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीवर थेट भाष्य केले. भाजपाचा मुंबईत विजय होतोय. पण तो विजय काझिरंगामध्ये साजरा केला जातोय. महाराष्ट्रात बहुसंख्य शहरात लोकांनी भाजपालाच सेवेची संधी दिलीय, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ५) मुख्यमंत्री फडणवीस आणि अमेरिकेचे राजदूत गोर यांच्यात चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांच्याशी राज्य आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर, विशेषतः गुंतवणूक वाढवणे आणि व्यावसायिक संबंधांचा विस्तार करण्याबाबत सखोल चर्चा केलीय. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या चर्चेला वाणिज्यदूत मायकल श्रुडर हे देखील उपस्थित होते. दोन्ही बाजूंनी राज्यातील अमेरिकन गुंतवणूक वाढवण्याच्या आणि अमेरिकेत आपला विस्तार करू पाहणाऱ्या राज्यातील कंपन्यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा झालीय. मुख्यमंत्र्यांनी अमेरिकन शिष्टमंडळाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय शिक्षण शहरासह राज्याच्या प्रमुख आणि धोरणात्मक उपक्रमांची माहिती दिलीय. अमेरिका-महाराष्ट्र भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी अधिक जवळून काम करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचेही त्यांनी सांगितलंय. ६) मनातून जातीभेद गेला तर 10-12 वर्षांत तो संपेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीभेद निर्मूलनाबाबत महत्त्वाचे विधान केलंय. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. जातीभेद नष्ट करायचा असेल तर सर्वप्रथम तो मनातून नष्ट करणे गरजेचे आहे. हे प्रामाणिकपणे केले, तर 10 ते 12 वर्षांत जातीभेद संपुष्टात येऊ शकतो, असं भागवत यांनी म्हटलंय. सुरुवातीला जात ही व्यवसाय आणि कामाशी संबंधित होती. मात्र कालांतराने ती समाजात भिनली आणि भेदभावाचे कारण ठरली. संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित या चर्चासत्रात प्रांत संघचालक अनिल भालेरावही उपस्थित होते. ७) भारताचे अमेरिकेला प्रतिउत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर आता भारतानेही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमेरिकेतून भारतात आयात होणाऱ्या डाळींवर भारताने 30 टक्के टॅरिफ लागू केल्याने अमेरिकेत खळबळ उडालीय. हा टॅरिफ 30 ऑक्टोबर 2025 पासून लागू असून, यामुळे अमेरिकेतील राजकीय आणि व्यापारी वर्तुळात अस्वस्थता वाढलीय. या निर्णयाविरोधात अमेरिकेतील नॉर्थ डकोटाचे खासदार केव्हिन क्रेमर आणि मोंटानाचे खासदार स्टीव्ह डेन्स यांनी थेट राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पत्र लिहलंय. भारताने हा टॅरिफ मागे घ्यावा यासाठी अमेरिकेने दबाव टाकावा, अशी मागणी त्यांनी केलीय. भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील डाळ उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा खासदारांनी केलाय. भारत ही डाळींसाठी मोठी बाजारपेठ असल्याने आयातशुल्क हटवावे, अशी जोरदार मागणी अमेरिकेकडून केली जात आहे. ८) ‘तिघी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित नवीन वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीसाठी उत्साहवर्धक ठरत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत मराठी सिनेसृष्टीची दमदार सुरुवात केलीय. त्यामुळे २०२६ मध्ये प्रेक्षकांना अनेक दर्जेदार मराठी चित्रपट पाहायला मिळणार असल्याची अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर नुकताच ‘तिघी’ या मराठी चित्रपटाचा उत्साह वाढवणारा टीझर प्रदर्शित झालाय. ‘तिघी’ या नावातच चित्रपटाची कथा दडलेली आहे. एक आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील भावनिक नातेसंबंध या चित्रपटात मांडण्यात आलेत. आतापर्यंत आईच्या भूमिकेवर आधारित अनेक मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलंय. ‘तिघी’ या चित्रपटातही आईला केंद्रस्थानी ठेवत कुटुंब, नाती आणि भावना यांचा हळुवार वेध घेण्यात येणार असल्याचे टीझरमधून स्पष्ट होतेय. ९) हर्षित राणाचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर भारतीय युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने आपल्या निवडीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना मैदानावरच उत्तर दिलंय. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केलंय. इंदूर येथील शेवटच्या सामन्यात त्याने एक अनोखी ‘हॅट्ट्रिक’ पूर्ण केली. हर्षितने या मालिकेतील तिन्ही सामन्यांत न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला बाद करण्याचा पराक्रम केलाय. तिसऱ्या सामन्यात त्याने कॉनवेला केवळ ५ धावांवर बाद केले. याशिवाय, त्याने विल यंगला बाद करून कीवींची अर्धशतकी भागीदारी फोडली आणि भारताला मजबूत स्थितीत नेले. २४ वर्षीय हर्षितने मालिकेत एकूण ५ विकेट्स घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. १०) डॅरिल मिचेल ठरतोय भारतासाठी नवा ‘व्हिलन’ न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने भारताविरुद्ध आपला जबरदस्त फॉर्म कायम राखत इंदूरच्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले. या मालिकेतील हे त्याचे सलग दुसरे आणि भारताविरुद्धचे चौथे शतक आहे. अवघ्या १३ सामन्यांत ४ शतके ठोकून त्याने सलमान बटला मागे टाकले असून, आता तो एबी डिव्हिलियर्सनंतर (५ शतके) या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. मिचेलने भारताविरुद्ध सलग ४ डावांत ५० हून अधिक धावा केल्यात. अशी कामगिरी करणारा तो केन विल्यमसननंतर दुसरा कीवी फलंदाज ठरलाय. गेल्या ७ एकदिवसीय सामन्यांत ६ वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या मिचेलने भारतीय गोलंदाजी फोडून काढलीय.