प्रभात वृत्तसेवा मंचर – अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील भोरमळ्यामध्ये हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभा उजव्या कालव्यावरून शनिवार, दि.२२ रोजी रात्री ११.३० वाजता जात असताना शेतकरी सोमनाथ भोर यांच्या चारचाकी वाहनासमोर अचानक बिबट्या आडवा गेला.चारचाकी गाडीमुळे शेतकरी थोडक्यात वाचला. काही क्षणांपूर्वीच एक दुचाकीस्वार त्या ठिकाणाहून निघून गेल्याने मोठा अनर्थ टाळला. शेतकरी सोमनाथ भोर हे आपले दैनंदिन काम संपवून घरी जात असताना त्यांच्या चारचाकी वाहनासमोर अचानक बिबट्याला आला. प्रसंगावधान राखून त्यांनी चारचाकी गाडीच्या काचा बंद केल्या. त्यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये बिबट्याचे छायाचित्र काढले. बिबट्या पूर्व बाजूच्या झाडीमध्ये सावकाश निघून गेल्याचे शेतकरी सोमनाथ भोर यांनी सांगितले. माजी ग्रामपंचायत सदस्य विकास भोर म्हणाले, पूर्व भागातील घोडनदी तसेच डिंभा उजवा-डावा कालवा असल्यामुळे या भागात बागायती शेती मोठ्या प्रमाणावर आहे. उसाचे विस्तीर्ण क्षेत्र असल्याने येथे बिबट्यांचे वास्तव्य वाढले असून ते रात्रीच्या वेळी वारंवार दिसून येतात. अवसरी वन उद्यान आणि वनविभाग कार्यालय जवळ असल्याने या भागात वन्यप्राण्यांची वर्दळ कायम असते.अचानक झालेल्या या बिबट्याच्या साक्षात्काराने नागरिक भयभीत झाले असून, या ठिकाणी तातडीने पिंजरा लावून संबंधित बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी त्यांनी वनविभागाकडे केली.