World Brain Day: दररोज फक्त ३० मिनिटे वाचन करा; मेंदू तल्लख ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले ५ सोपे उपाय
World Brain Day वाचन हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही, तर ते मेंदूचा उत्तम व्यायामही आहे. पुस्तक वाचताना भाषा समजून घेणे, कल्पनाशक्ती वापरणे, माहिती लक्षात ठेवणे आणि तिचे विश्लेषण करणे अशा अनेक प्रक्रिया एकाच वेळी सुरू असतात. त्यामुळे मेंदूचे विविध भाग सक्रिय राहतात आणि विचार करण्याची क्षमता वाढते.

World Brain Day: आजच्या डिजिटल युगात बहुतांश लोकांचा वेळ मोबाईल, संगणक किंवा इतर स्क्रीनसमोर जातो. त्यामुळे पुस्तके वाचण्याची सवय कमी होत चालली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते दररोज अवघी ३० मिनिटे पुस्तक वाचण्याची सवय लावली, तर मेंदू दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय राहण्यास मोठी मदत होते. जागतिक मेंदू दिन (World Brain Day) निमित्ताने तज्ज्ञांनी मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयींची माहिती दिली आहे.
वाचन हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही, तर ते मेंदूचा उत्तम व्यायामही आहे. पुस्तक वाचताना भाषा समजून घेणे, कल्पनाशक्ती वापरणे, माहिती लक्षात ठेवणे आणि तिचे विश्लेषण करणे अशा अनेक प्रक्रिया एकाच वेळी सुरू असतात. त्यामुळे मेंदूचे विविध भाग सक्रिय राहतात आणि विचार करण्याची क्षमता वाढते.
तज्ज्ञांच्या मते नियमित वाचनामुळे मेंदूमध्ये ‘कॉग्निटिव्ह रिझर्व्ह’ विकसित होतो. यामुळे वय वाढल्यानंतरही स्मरणशक्ती, एकाग्रता आणि विचार करण्याची क्षमता टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने रोज थोडा वेळ वाचनासाठी राखून ठेवावा.
दररोज वाचन केल्याचे फायदे
नियमित पुस्तक वाचल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढते आणि शब्दसंपत्ती समृद्ध होते. तणाव व चिंता कमी होण्यास मदत होते. इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता वाढते. तसेच रात्री झोपण्यापूर्वी काही वेळ वाचन केल्यास शांत झोप लागण्यासही मदत होऊ शकते.
World Brain Day
मेंदू निरोगी ठेवण्यासाठी ५ सोपे उपाय
१. नियमित व्यायाम करा
दररोज चालणे, योग, सायकलिंग किंवा पोहणे यांसारखा हलका व्यायाम केल्याने मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळते. याचा स्मरणशक्ती आणि विचारशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो.
२. ध्यान करण्याची सवय लावा
दररोज काही मिनिटे ध्यान केल्याने तणाव आणि मानसिक थकवा कमी होतो. एकाग्रता वाढते आणि मेंदू अधिक शांत व स्थिर राहतो.
३. कॅफिनचे प्रमाण मर्यादित ठेवा
मर्यादित प्रमाणात चहा किंवा कॉफी घेतल्याने लक्ष केंद्रित करण्यास मदत होऊ शकते. ग्रीन टीमधील काही घटक मेंदूच्या कार्यक्षमतेसाठीही उपयुक्त मानले जातात. मात्र, कॅफिनचे अतिसेवन टाळावे.
४. रोज वाचनाची सवय लावा
दररोज किमान ३० मिनिटे पुस्तक, कादंबरी किंवा माहितीपूर्ण लेख वाचा. नियमित वाचनामुळे मेंदूतील न्यूरल कनेक्शन मजबूत होतात, स्मरणशक्ती सुधारते आणि शिकण्याची क्षमता वाढते.
५. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा
सामाजिक संवादही मेंदूसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. कुटुंबीय आणि मित्रांसोबत गप्पा मारणे, वेळ घालवणे किंवा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणे यामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
जागतिक मेंदू दिनाचा उद्देश
दरवर्षी २२ जुलै रोजी जागतिक मेंदू दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश मेंदूच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे हा आहे. पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि वाचनाची सवय या गोष्टी मेंदू दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.
लहानसा बदलही मोठा परिणाम घडवू शकतो. त्यामुळे दररोज फक्त ३० मिनिटे वाचन करण्याची सवय लावून मेंदू अधिक तल्लख, सक्रिय आणि निरोगी ठेवता येऊ शकतो.





