१. भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्याला फाटा देत थेट एबी फाॅर्मचे वाटप केल्यानं चांगलाच गोंधळ उडाला. पक्षानं त्या त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांकडे एबी फाॅर्म वाटपासाठी दिले होते. त्यामुळे, ज्यांना हे फाॅर्म मिळाले त्यांनी शक्तीप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांची नावे पाहिली तर पक्षाने तब्बल ३० ते ३५ माजी नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवलाय. आरक्षण तसेच इतर कारणास्तव काही प्रभागात माजी नगरसेवकांच्या कुटूंबियांना उमेदवारी देण्यात आलीय. या सर्वात नाराज माजी नगरसेवकांनी सोशल मिडीयावर पक्षाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. पक्षाकडून काही ठराविक प्रभागांच्याच नगरसेवकांना एबी फार्म दिले असून अनेकांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले तर आज उर्वरीत उमेदवारांना एबी फाॅर्म दिले जाणार असल्याचे सांगण्यात आलंय. त्यामुळं फाॅर्म न मिळाल्यानं अनेक दिग्गज उमेदवार प्रतिक्षेत आहेत. २. काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटाची आघाडी पक्की महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात आघाडी झाली असून, शंभर जागांवर सहमती झाली आहे. काँग्रेसला साठ आणि शिवसेनेला ४० जागा ठरल्या आहेत. आणखी काही प्रभागांतील उमेदवारांची यादी अंतिम झाली नसून, त्यावर आज चर्चा पूर्ण होऊन रात्री उशिरापर्यंत निर्णय होईल, अशी माहिती शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दिली.राज्यातील सत्ता एकत्र उपभोगायची आणि महापालिकेसाठी मात्र विरोधात लढण्यासाठी तात्पुरता घटस्फोट घ्यायचा, ही चाल पुणेकरांनी ओळखली आहे. आदित्य ठाकरे यांनी पुण्यासाठीचे ‘व्हिजन’ सादर केले आहे. पुणेकर आम्हालाच मतदान करतील, असा विश्वासही सचिन आहिर यांनी व्यक्त केलाय. ३. अजित पवार – धंगेकर भेटीने खळबळ काॅंग्रेसमधून शिवसेनेत गेलेले कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी वाट वाकडी करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. या नाट्यमय घटनेनंतर ही भेट जागांच्या चर्चेसाठी नसून, केवळ चहा पिण्यासाठी होती असे स्पष्टीकरण धंगेकर यांनी दिलं. भाजपने काहीजणांना थेट एबी फॉर्म दिले असले तरी युतीत शिवसेनेला किती, कोणत्या जागा द्यावयाचा हा प्रश्न सुटलेला नाही. शिवसेनेत आल्यानंतरही धंगेकर यांनी विरोधात वक्तव्य केल्याने भाजपने त्यांची कोंडी केलीय. धंगेकर यांनी पत्नी, मुलासाठी उमेदवारी मागितली. प्रसंगी मुलाला अपक्ष म्हणून उभा करेन आणि वडील म्हणून त्याचा प्रचार करण्याची भूमिका धंगेकर यांनी रविवारी घेतली. या भेटीने नाशिकप्रमाणे पुण्यातही शिंदे-राष्ट्रवादी युती होते का अशी चर्चा सुरू आहे. ४. अर्ज भरण्यासाठी आज दुपारी तीनपर्यंतच मुदत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला, तरी अद्यापही पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागांवाटपांचे गुऱ्हाळ संपलेले नाही. त्यामुळे सोमवारी कोणत्याही राजकीय पक्षान उमेदवारी याद्या जाहीर केलेल्या नाहीत. भाजपनं बंडखोरी रोखण्यासाठी याद्यांऐवजी थेट उमेदवारांना एबी फाॅर्म दिलेत, तर अनेक उमेदवार नवीन असल्याने अद्याप त्यांचे अर्जही तयार नाहीत. त्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची झुंबड उडणार आहे. त्यामुळं महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेवर ताण येऊन गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं, वंचित बहुजन आघाडीसह इतर अपक्ष, तसेच आणखी काही राजकीय पक्षांचे उमेदवारही अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे मिरवणुका, तसेच कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे गोंधळाची शक्यता असून, पालिका प्रशासनाकडून त्यासाठी नियोजन करण्यात आलंय. ५. निवडणुकीपूर्वी पुणे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई ‘महापालिका निवडणुका शांततेत पार पाडणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहचविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. महापालिका निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आतापर्यंत साडेपाच हजार जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय. पुणे शहरात वर्षभरात घडलेले गंभीर गुन्हे, तसेच आकडेवारी याबाबतची माहितीदेखील देण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांवर पोलिसांकडून नजर ठेवण्यात येणार आहे. ६ . महापालिकेत एका दिवसात ६९४ अर्ज दाखल महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी काल क्षेत्रीय कार्यालयांच्या निवडणूक कार्यालयांकडे झुंबड उडाली होती. सोमवारी दिवसभरात १५ निवडणूक कार्यालयांकडे तब्बल ६९४ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान , या सर्व कार्यालयांमधून एकूण ६९४ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळं आज अर्ज भरण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची झुंबड उडाली होती. दरम्यान, तर काल दिवसभरात १४४९ अर्जांची विक्री झाली असून अर्ज विक्रीचा आकडा ११ हजारांच्या वर गेला आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यान पुन्हा एकदा क्षेत्रीय कार्यालयाच्या यंत्रणांवर ताण पडणार असल्याचं दिसतंय. ७. आमदार, खासदारांच्या मुलांना महापालिकांचं तिकीट नाही नगरपालिका निवडणुकीलाएकाच घरातील 6 उमेदवारांना तिकीट देणाऱ्या भाजपने महापालिका निवडणुकांसाठी नवा पॅटर्न सुरू केला आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून महापालिका निवडणुकीत आमदार-खासदारांच्या मुलास किंवा पत्नीस उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार, भाजपकडून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जात आहे. मात्र, या यादीत आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आलं नाही. याशिवाय ज्या प्रभागातून आमदार-खासदारांच्या मुलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तिथे माघार घेण्यात आली आहे. नाशिकमध्ये दोन्ही महिला आमदारांच्या मुलांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. ८. पनवेल महापालिकेसाठी भाजप-शिवसेना युती जाहीर नवी मुंबईत महायुतील पक्ष एकमेकांविरुद्धात दंड थोपटणारे पक्ष पनवेल महानगरपालिकेत युती करणार आहेत. पनवेल महापालिकेसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना याची युती झाली आहे. या युतीचे जागावाटपही जाहीर करण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांनी हे जागावाटप जाहीर केलं. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपले जागावाटप जाहीर केले आहे.पनवेल महापालिकेसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि आरपीआय आठवले अशी युती झाली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये शेकाप, ठाकरे गट, शरद पवार गट यांच्यासह इतर घटक पक्षांची आघाडी झाली आहे. पनवेल महापालिकेसाठी भाजप आपले ७१ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. तर शिंदेंची शिवसेना चार जागांवर लढणार आहे. ९. ‘त्या’ व्हिडिओसाठी ललित मोदींनी मागितली माफी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते विजय मल्ल्यासोबत “आम्ही भारताचे दोन सर्वात मोठे फरार आहोत.” असे म्हणताना दिसत होते. या व्हायरल व्हिडिओबद्दल त्यांनी आता भारत सरकारची माफी मागितलीय. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीय. ज्यात, “माझा कधीही कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, विशेषतः भारत सरकारला, ज्याबद्दल मला सर्वात जास्त आदर आणि आदर आहे. माझ्या विधानाचा ‘चुकीचा अर्थ लावण्यात आला’ असे म्हटले आहे. दरम्यान , विजय मल्ल्याने अजून या व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. १०. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. त्यांच्या विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने या वृत्ताला दुजोरा दिलाय. ८० वर्षीय खालिदा झिया या अनेक आजारांनी ग्रस्त होत्या. त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता. खालिदा झिया यांनी १९९१ ते १९९६ आणि त्यानंतर २००१ ते २००६ पर्यंत दोनदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्या माजी राष्ट्रपती आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे संस्थापक झियाउर रहमान यांच्या पत्नी होत्या. त्यांचा मोठा मुलगा, बीएनपीचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान २००८ पासून लंडनमध्ये राहत होते. या महिन्यात ते बांगलादेशला परतले आहेत .