‘पुरंदर विमानतळासाठी पर्यायी जागांची पुन्हा तपासणी करा’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासनाला सूचना

पुणे – पुरंदर तालुक्‍यात प्रस्तावित आंतरराष्टीय विमानतळाच्या भूसंपादनास सुरूवात करण्यापूर्वी निश्‍चित करण्यात आलेल्या जागेसह याच तालुक्‍यातील लगतच्या पर्यायी चार जागांची हवाई दल आणि संरक्षण विभागाकडून पुन्हा एकदा तपासणी करून घ्यावी. तसेच, भूसंपादनगतीने व्हावे आणि शेतकऱ्यांचाही अधिकचा फायदा कसा होईल, यासाठी मोबदला निश्‍चित करताना एकच पर्याय न ठेवता दोन ते तीन पर्याय एकत्रित करून सर्वोत्तम पर्याय सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

पुरंदर विमानतळासंदर्भात मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठक घेतली. याबैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.पुरंदर तालुक्‍यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठीच्या पर्यांयावर अभ्यास करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

एका बाजूला करोनाशी दोन हात करण्याचे काम सुरु असताना दुसऱ्या बाजुला जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यावर उपमुख्यमंत्री पवार यांचा भर आहे. त्यादृष्टीने पुरंदर विमानतळ प्रकल्पाला गती देण्यासाठी पवार यांनी मंगळवारी मुंबई येथे बैठक घेतली. या बैठकीत जागेचे भूसंपादन आणि मोबदला देण्यासंदर्भात अजूनही ठोस असा निर्णय झालेला नाही.

मात्र विमानतळासाठी पुरंदर तालुक्‍यातील निश्‍चित करण्यात आलेल्या लगतच्या जागेसह अन्य जागेची संरक्षण व हवाई दलाकडून पुन्हा पाहणी करण्याच्या सूचना पवार यांनी याबैठकीत दिल्या. आता, भूसंपादनासाठी रोख मोबदल्याचा पर्याय दिल्यास निधी सुध्दा तात्काळ उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. तसेच निधीची शाश्‍वती राज्य शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे.

भूसंपादन मोबदल्याचे पर्याय…
– थेट खरेदीने म्हणजे एकरकमी मोबदला देणे
– शेतकऱ्यांना शेती महामंडळाची पर्यायी जागा देणे
– मगरपट्टा सिटीच्या धर्तीवर विमानतळ विकास कंपनीमध्ये भागधारक म्हणून सहभागी करून घेणे
– पर्यायी शेतजमिनी देणे आणि निर्वाह भत्ता देणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.