NEET Paper Leak: नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता पिंपरी-चिंचवड शहरात तीव्र स्वरूपात उमटू लागले आहेत. ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली. यानंतर संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. १९ मे) रोजी शहरात आंदोलन करत आरसीसीच्या फलकाची तोडफोड केली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात संताप व्यक्त केला. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी आंदोलकांनी केली. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर पॅटर्नमधील चर्चित नाव असलेले प्रा. शिवराज मोटेगावकर यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. सीबीआयच्या तपासादरम्यान त्यांच्या निवासस्थान आणि संस्थेतून महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर करण्यात आलेल्या अटकेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. NEET Paper Leak लाखो विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र पैशांच्या जोरावर पेपरफुटी करून काही जण विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरत आहेत. शिक्षण क्षेत्रात सुरू असलेला हा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत आंदोलन कत्र्यांनी व्यक्त केले. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब गजधने, ब्रह्मानंद जाधव, प्रसाद दौंडकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. NEET Paper Leak Nashik Fata : दिशा दर्शक फलकांची दूरवस्था; वाहचालकांमध्ये संभ्रम