RBI Repo Rate : महागाईचा भडका, रुपया कमजोर; आरबीआय व्याजदर वाढवणार?
RBI Repo Rate : महागाई, कमजोर रुपया आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे RBI समोर रेपो दर वाढवण्याचे आव्हान आहे. मजबूत GDP वाढ मात्र दिलासा देत आहे.

RBI Repo Rate : महागाई, कमजोर रुपया, महागलेले कच्चे तेल आणि जागतिक आर्थिक दबाव यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेसमोर पुन्हा व्याजदर वाढवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. ऑगस्टच्या पतधोरणात RBI ने रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला होता. मात्र, महागाईचा दबाव वाढल्यास भविष्यात पतधोरण अधिक कडक करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
खाद्यपदार्थ, इंधन आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्यास त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर होऊ शकतो. महागाई दीर्घकाळ वाढत राहिल्यास महागाईच्या अपेक्षाही अस्थिर होण्याची भीती आहे. त्यामुळे गरज भासल्यास व्याजदर वाढवावे लागू शकतात.
दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला असून तो 96.31 रुपयांवर बंद झाला. सरकारी रोख्यांवरील परतावाही वाढला आहे. अमेरिकेतील वाढलेले बॉन्ड यिल्ड आणि मजबूत डॉलर यामुळे भारतासह इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवर दबाव निर्माण झाला आहे.
कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम बाजारातील वस्तूंच्या किमतींवर होऊ शकतो. याशिवाय 2026 मधील मान्सूनमध्ये 12.6 टक्के पावसाची कमतरता राहिल्याने खाद्यपदार्थांच्या महागाईची चिंता वाढली आहे.
मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक बाब म्हणजे जीडीपी वाढ मजबूत आहे. आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत भारताची वास्तविक जीडीपी वाढ 7.8 टक्के झाली. बँक कर्जवाढही मजबूत राहिली आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक वाढीला सध्या चांगला आधार मिळत आहे.
महागाई आणि वाढ यांचा समतोल साधणे हे RBI समोरील मुख्य आव्हान आहे. पुढील पतधोरणात दरवाढ होते का, यापेक्षा RBI महागाई आणि व्याजदरांबाबत कोणते संकेत देते, याकडे बाजाराचे लक्ष राहणार आहे.
आरबीायची बैठक सुरू –
RBIच्या पतधोरण समितीची (MPC) तीन दिवसीय बैठक आज, 5 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून 7 ऑक्टोबरला निर्णय जाहीर होणार आहे. सध्या रेपो दर 5.25% आहे. महागाई, महागलेले कच्चे तेल, कमजोर रुपया आणि जागतिक व्याजदरांचा दबाव पाहता 0.25% दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे.





