पणजी – सायबर फसवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या देशव्यापी आरबीआय कहता है मोहिमेच्या संदर्भात, आरबीआय पणजी प्रादेशिक कार्यालयाने डिसेंबर 2025 मध्ये गोव्यात विविध जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणांसह समाजातील विविध घटकांचा समावेश होता. पणजीमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला ज्यांना सायबर गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जात आहे, त्यांच्यासाठी या मोहिमेचा एक भाग म्हणून, एक विशेष सायबर फसवणूक जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आरबीआयचे कार्यकारी संचालक विवेक दीप आणि आरबीआय पणजीचे प्रादेशिक संचालक प्रभाकर झा आणि गोवा पोलिसांच्या सायबर क्राइम सेलचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर उपस्थित होते जे अतिथी वक्ते देखील होते. गोव्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना लक्ष्य केल्या जाणार्या सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना अधोरेखित करत प्रभाकर झा यांनी विविध लोकसंख्या गटांसाठी तयार केलेल्या आरबीआयच्या सक्रिय वित्तीय साक्षरता उपक्रमांबाबत माहिती दिली. अज्ञान, भीती आणि लोभ हे सायबर फसवणुकीचे तीन महत्त्वाचे घटक असल्याचे नमूद करत आरबीआयचे कार्यकारी संचालक विवेक दीप यांनी ज्येष्ठ नागरिक विशेषतः असुरक्षित का आहेत हे स्पष्ट करताना मर्यादित तांत्रिक साक्षरता, आर्थिक स्थिरता आणि वाढता सोशल मीडिया वापर यासारख्या घटकांचा उल्लेख केला.