RBI Action: ‘या’ 3 सरकारी बॅंकेत तुमचेही खाते आहे का? आरबीआयने ठोठावला मोठा दंड, खातेदारांचे पैसे सुरक्षित
RBI Action: आरबीआयने स्पष्ट केले आहे की, हा दंड बँकांच्या अंतर्गत प्रक्रियेतील त्रुटींसाठी आहे. ग्राहकांच्या खात्यातील रक्कम आणि त्यावरील व्याज पूर्णपणे सुरक्षित आहे. या कारवाईमुळे भविष्यात बँका ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण अधिक तत्परतेने करतील आणि अनधिकृत व्यवहारांमध्ये पैसे परत मिळण्याची शक्यता वाढेल.

RBI Action: बँकिंग नियमांचे उल्लंघन आणि ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे तीन मोठ्या सरकारी बँकांना महागात पडले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियमावलीचे पालन न केल्याबद्दल युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यासोबतच प्रसिद्ध फिनटेक कंपनी ‘पाइन लॅब्स’लाही दंड ठोठावण्यात आला आहे.
कोणाला किती दंड?
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नियमांच्या उल्लंघनासाठी युनियन बँक ऑफ इंडियाला ९५.४० लाख रुपये, सेंट्रल बँक ऑफ इंडिया: ६३.६० लाख रुपये, बँक ऑफ इंडिया: ५८.५० लाख रुपये, पाइन लॅब्स: ३.१० लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.
दंड का ठोठावण्यात आला?
१. युनियन बँक ऑफ इंडिया (ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष):
या बँकेने अनधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहारांची तक्रार मिळाल्यानंतर १० दिवसांच्या आत ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा केले नाहीत. तसेच, संशयास्पद व्यवहारांची माहिती देण्यासाठी २४ तास सुविधा उपलब्ध करून देण्यात बँक अपयशी ठरली. काही कर्ज खात्यांच्या वर्गीकरणात मानवी हस्तक्षेप केल्याचा ठपकाही बँकेवर ठेवण्यात आला आहे.
२. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (KYC मध्ये त्रुटी):
ठराविक वेळेत ग्राहकांचे केवायसी (KYC) रेकॉर्ड्स मध्यवर्ती नोंदणी विभागाकडे अपलोड न केल्यामुळे ही कारवाई झाली. तसेच, काही ग्राहकांकडे आधीच ‘BSBD’ खाते असताना त्यांचे पुन्हा दुसरे अतिरिक्त खाते उघडण्यात आले.
३. बँक ऑफ इंडिया (व्याज आणि शुल्कात चूक):
या बँकेने प्राधान्य क्षेत्रातील कर्ज खात्यांकडून चुकीच्या पद्धतीने सर्व्हिस आणि प्रोसेसिंग चार्ज वसूल केला. याशिवाय, मुदत ठेव (FD) पूर्ण झाल्यानंतर आणि पैसे मिळेपर्यंतच्या मधल्या काळातील व्याजाचा परतावा ग्राहकांना दिला नाही.
४. पाइन लॅब्स (अपूर्ण ओळख):
केवायसी प्रक्रिया पूर्ण न करताच अनेक ग्राहकांना प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) जारी केल्याबद्दल या कंपनीला दंड झाला आहे.
सामान्य ग्राहकांवर काय परिणाम होईल?
आरबीआयने स्पष्ट केले आहे की, हा दंड बँकांच्या अंतर्गत प्रक्रियेतील त्रुटींसाठी आहे. ग्राहकांच्या खात्यातील रक्कम आणि त्यावरील व्याज पूर्णपणे सुरक्षित आहे. या कारवाईमुळे भविष्यात बँका ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण अधिक तत्परतेने करतील आणि अनधिकृत व्यवहारांमध्ये पैसे परत मिळण्याची शक्यता वाढेल.





