Rupee: रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व बँकेने व्यवसायिक बँकांच्या परकीय चलन विषयक व्यवहारावर काही मर्यादा आणल्या आहेत. यामुळे सकाळी रुपयाचे मूल्य 128 पैशांनी वधारण्यास मदत झाली. मात्र नंतर या उपाययोजना करूनही रुपयाचे मूल्य ही पातळी राखू शकले नाही. दिवसाअखेर रुपयाचे मूल्य शुक्रवारच्या तुलनेत केवळ सात पैशांनी वाढून 94.78 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले होते. काही काळ रुपयाचे मूल्य 95 रुपये प्रति डॉलर या पातळीपेक्षा खाली घसरले होते. आतापर्यंत रिझर्व बँक रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासाठी डॉलरची विक्री करत होती. मात्र हा पर्याय पुरेसा ठरत नसल्यामुळे आता रिझर्व बँकेने इतर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या उपायोजनानुसार रिझर्व बँकेने व्यवसायिक बँकांना नेट ओपन पोझिशनसाठी 100 दशलक्ष डॉलरची मर्यादा निश्चित केली असून या निर्णयाची अंमलबजावणी दहा एप्रिल पासून होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात सीआर फॉरेक्स अॅडव्हायझरचे व्यवस्थापकीय संचालक अमित पावरी यांनी सांगितले की, आखातातील युद्धामुळे गुंतवणूकदार अधिक सुरक्षित वित्तीय साधनाकडे वळत आहेत. त्यामुळे अमेरिकन डॉलर आणि अमेरिकन कर्जरोख्यात गुंतवणूक वाढत आहे. अशा परिस्थितीत डॉलर बळकट होत आहे आणि इतर देशांचे चलन कमकुवत होत आहे. हेही वाचा – Industrial: मॅन्युफॅक्चरिंगच्या जोरावर औद्योगिक उत्पादनात 5.2% वाढ; मार्चमध्ये घट होण्याची शक्यता याचा सर्वाधिक परिणाम भारतासारख्या विकसनशील देशावर होत असतो. आखातातील युद्ध संपुष्टात आल्याशिवाय रुपयाचे अवमूल्यन थांबणार नाही. चालू आर्थिक वर्षात म्हणजे गेल्या 11 महिन्यात रुपयाचे मूल्य तब्बल दहा टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे भारताला आयात मागत पडत आहे. तसेच भारतात महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व बँकेने आपल्याकडील बरेच डॉलर उपयोगात आणले आहेत. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा गेल्या तीन महिन्यात बराच कमी झालेला आहे. भारताकडे असलेला परकीय चलन साठा भारताला एक वर्षाच्या आयातीसाठी पुरेसा असल्याचे समजले जाते.